स्वागतयात्रांचा अपूर्व उत्‍साह

स्वागतयात्रांचा अपूर्व उत्‍साह

नवचैतन्याचा गोडवा... आला गुढीपाडवा!
मुंबईत आज स्वागतयात्रांचा अपूर्व उत्‍साह
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : कोरोनाच्या दीर्घ कालखंडानंतर पुन्हा एकदा सण-उत्सवांचा जल्लोष सुरू झाला आहे. गुढीपाडव्यानिमित्त मुंबईतील मराठमोळ्या वस्त्यांत यंदा प्रचंड उत्साहात नववर्ष स्वागतयात्रा निघणार आहे. स्वागतयात्रेत विविध संदेश देणारे चित्ररथही सहभागी होणार असून त्याची जय्यत तयारी झाली आहे. पावसाचे मळभ असले, तरीही उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. नवचैतन्याचा गोडवा अनुभवण्यासाठी अवघी मुंबई सज्ज झाली आहे. पारंपरिक वेशभूषेत सहभागी होणारे मुंबईकर आणि बाईकस्वार तरुण-तरुणींचा उत्स्फूर्त सहभाग यंदाच्या स्वागतयात्रांचे आकर्षण ठरणार आहे.
दादर, प्रभादेवी, परळ, लालबाग, विलेपार्ले, अंधेरी, गोरेगाव आणि बोरिवलीपासून घाटकोपर, भांडुप ते थेट मुलुंडपर्यंत शोभायात्रा दिमाखात निघणार आहे. दादर आणि गिरगावमध्ये निघणाऱ्या स्वागतयात्रांची विशेष ओळख आहे. मराठी नववर्षाच्या पहिल्या दिवशी विविध जाती, प्रांत आणि धर्मांच्या ग्रामस्थांना एका व्यासपीठावर आणण्याच्या उद्देशाने डोंबिवलीत सुरू झालेली नववर्ष स्वागतयात्रा आता सर्वदूर पोहचली आहे. त्यानुसार मुंबईत विविध थीमनुसार अनेक ठिकाणी शोभायात्रा निघणार आहेत. गिरगावमधील बेडेकर सदनतर्फे निघणाऱ्या यात्रेतील चित्ररथात आर्य चाणक्य यांचा २२ फुटी पुतळा आकर्षण ठरणार आहे. गोरेगावात निघणाऱ्या शोभायात्रेत ‘नारी तू घे भरारी’ असा संदेश देण्यात येणार आहे. विविध क्षेत्रांत कर्तृत्व गाजवलेल्या महिलांना समर्पित असलेल्या देखाव्यांची तयारी त्यानिमित्त करण्यात आली आहे. अनेक मंडळांतर्फे गेल्या आठवडाभरापासून विविध सांस्कृतिक, सामाजिक आणि आध्यात्मिक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.

विलेपार्ल्यात ५७ फुटी गुढी
विलेपार्ले पूर्व विभागात जनसेवा समितीतर्फे स्वागतयात्रा काढली जाते. पार्ले विभागातून विविध मंडळे आणि संस्था त्यात सहभागी होतात. ‘कोकण कट्टा’तर्फे यंदा ५७ फूट उंच गुढी उभारली जाणार आहे. नेहमीप्रमाणेच यंदाही ती पार्लेकरांचे आकर्षण ठरणार आहे. पार्ल्यातील नामवंत संस्था असलेल्या लोकमान्य सेवा संघाचा यंदा शतकपूर्ती सोहळा आहे.

मुख्यमंत्री डोंबिवलीत
डोंबिवलीतील गणेश मंदिर संस्थानचे यंदा नववर्ष स्वागतयात्रेचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्त विविध उपक्रम होणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार राजू पाटील, विविध चित्रपट कलाकार बुधवारी होणाऱ्या स्वागतयात्रेत उपस्थित राहणार आहेत. त्यानिमित्त डोंबिवली फडके रोड परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

ठाण्यात दहा हजार फुटांची रांगोळी
भाजप ठाणे शहरच्या वतीने ‘जी-२०’ विषयावर समर्पित चित्र प्रदर्शन भरवण्यात आले आहे. ‘संस्कार भारती’च्या कोकण प्रांत ठाणे जिल्हा समितीच्या वतीने गावदेवी मैदानात दहा हजार चौरस फुटांची भव्य रांगोळी रेखाटली जाणार आहे. भारतात होणाऱ्या शिखर परिषदेच्या निमित्ताने २० देशांतील वेगवेगळ्या क्षेत्रांतील अनेक प्रतिनिधी भारत भेटीवर येत आहेत. त्याच विषयाला समर्पित असलेली भव्य रांगोळी ‘संस्कार भारती’तर्फे काढली जाईल.

ढोल-ताशा पथकांचा उत्साह
ढोल-ताशा पथक स्वागतयात्रांचा अविभाज्य भाग आहे. जल्लोषाकरिता अनेक ढोल-ताशा पथकेही सज्ज झाली आहेत. शोभायात्रेदरम्यान त्यांची पारंपरिक वाद्यांची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे लहान मुलांपासून अनेक ज्येष्ठ नागरिकांचा पथकात समावेश आहे. मुली आणि तरुणींचे ढोल पथकही सहभागी होणार आहे.

झेंडू १५० ते २०० रुपये किलो
शिवडी (बातमीदार) ः मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लागणारी फुले खरेदी करण्यासाठी मंगळवारी मुंबईतील सर्वच बाजार फुलून गेले होते. दादर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची झुंबड उडालेली दिसली. सकाळी पाऊस पडल्याने तुरळक गर्दी होती. दुपारनंतर मात्र फूल बाजार भरून गेला. इतर वेळी ८० ते १०० रुपये किलो दराने मिळणारा झेंडू यंदा १५० ते २०० रुपये विकला जात होता.
साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला गुढीपाडवा उत्साहात साजरा करण्यासाठी फुलांची आणि तोरणांची खरेदी करण्यात येते. दादर व परळच्या फूल बाजारात खरेदीसाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली होती. फुलांचा दर वाढला असला, तरी गुढीपाडव्याच्या दिवशी त्यांना जास्त महत्त्व असते. देवघर व गुढी सजावटीपासून रस्तोरस्ती काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीनिमित्त गोंडा व झेंडूच्या फुलांना अधिक महत्त्व असते. गोंडा व आंब्याचा टाळा असलेले तयार तोरण ८० ते १०० रुपये प्रतिमीटर मिळत होते. त्याचबरोबर कडुलिंबाचा टाळा ५ ते १० रुपये प्रतिजुडी विकला जात होता. फुले महागली तरी मार्केटमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com