पालिका रोखणार जलस्रोतांचे प्रदूषण

पालिका रोखणार जलस्रोतांचे प्रदूषण

मुंबई, ता. २१ ः रसायनमिश्रित पाणी तलाव, नद्या आणि पर्जन्यवाहिन्यांमध्ये मिसळत असल्याने पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे दूषित पाण्याचे प्रवाह मलनिःसारण वाहिन्यांमध्ये वळवण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पालिकेने हाती घेतला आहे. त्यासाठी शहर आणि उपनगरातील मलनिःसारण वाहिन्यांचे जाळे अधिक व्यापक करण्याचा कृती आराखडा तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
मुंबईत मलनिःसारण वाहिन्यांचे मोठे जाळे आहे. गेल्या काही वर्षांत मुंबईत झपाट्याने झोपडपट्ट्या वाढल्या आहेत. तेथे या वाहिन्या काढण्यासाठी जागाच नसल्याने मोठी अडचण आहे; मात्र मुंबईतील सुमारे २०४५ किलोमीटर लांबीच्या रस्त्यालगत मलनिःसारण वाहिन्यांचे जाळे आहे. शहर भागात जुन्या मलनिःसारण वाहिन्यांची अंतर्गत पडझड झाली आहे. तेथेही नव्याने वाहिन्या टाकण्यात येत आहेत. हे जाळे अधिक व्यापक करून जलप्रदूषणाला आळा घालण्याचा कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. दूषित आणि रसायनमिश्रित पाणी जलस्रोतांमध्ये जाऊन तलाव, नद्या, तसेच पर्जन्य जलवाहिन्यांमध्ये जाऊन हे जलस्रोत प्रदूषित होऊ नयेत, यासाठी ते प्रवाह मलनिःसारण वाहिन्यांशी जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतील मलनिःसारण वाहिन्यांच्या सुधारणा करण्याला २०१६ पासून सुरुवात झाली. टप्प्याटप्प्याने निविदा काढून ही कामे वेगाने सुरू आहेत. म्हाडा तसेच शासकीय वसाहतीतील मलनिःसारण वाहिन्यांचे जाळेही बदलण्याची कामे पालिका लवकरच हाती घेणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सदर कामासाठी आठशे कोटी रुपये खर्च येणार आहे.
------------------
तलावांचे होणार पुनरुज्जीवन
कुर्ला येथील शीतल तलाव, सायन तलाव आणि पश्चिम उपनगरातील डिंगेश्वर तलावाचे पुनरुज्जीवन करण्याचे काम सुरू आहे. या तलावांमध्ये येणाऱ्या दूषित पाण्याचे प्रवाह मलनिःसारण वाहिन्यात वळवण्यात येणार असल्याची माहिती मलनिःसारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. या प्रकल्पासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com