अवकाळीने शेतकऱ्यांवर दुहेरी संकट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवकाळीने शेतकऱ्यांवर दुहेरी संकट
अवकाळीने शेतकऱ्यांवर दुहेरी संकट

अवकाळीने शेतकऱ्यांवर दुहेरी संकट

sakal_logo
By

मोखाडा, ता. २३ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यात आठवडाभरापासून विविध ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे रब्बीची पिके, फुलशेती, फळबागा आणि वीटभट्ट्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे सुरू आहेत. मार्च महिन्यात खरिपाच्या मशागतीला सुरुवात झाली होती. मात्र राब भाजणीच्या हंगामात पाऊस कोसळ्याने गवत, कवळ्या आणि पालापाचोळा हे राब भाजणीचे साहित्य भिजले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत.
अवकाळी पावसाने पालघर जिल्ह्यात १५ मार्चपासून सुरुवात केली आहे. जिल्ह्याच्या विविध भागात रोजच पाऊस कोसळत आहे. काही भागात मेघगर्जना, वादळ तसेच गारपीट होऊन मुसळधार पाऊस कोसळला आहे. त्याचा मोठा परिणाम फुलशेती, फळबाग आणि रब्बी पिकांवर झाला आहे. फुलशेती, फळबागा आणि रब्बीची पिके अनेक भागांत जमीनदोस्त झाली आहेत. तसेच जिल्ह्यातील वीटभट्ट्यांमध्ये अवकाळीने अक्षरशः चिखल झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह वीटभट्टी व्यवसायिकांचे कंबरडे मोडले आहे. त्यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे. सरकारने शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, कर्मचारी संपाने ते सात दिवस रखडले होते. आता कर्मचारी पुन्हा कामावर हजर झाल्याने, पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहेत.
....
खरिपाच्या मशागतीला ब्रेक
गेली आठवडाभरापासून विविध ठिकाणी कोसळलेल्या अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणाने खरीप हंगामाच्या मशागतीला ही ब्रेक लागला आहे. मार्च महिन्यात खरीपाच्या मशागतीला सुरुवात झाली होती. राब भाजणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू होती. पालघर जिल्ह्यात खरिपाचे एक लाख पाच हजार हेक्टर लागवडीचे क्षेत्र आहे. यामध्ये सर्वाधिक ७५ हजार हेक्टर क्षेत्र भातपिकाचे आहे. भाताची, नागली आणि वरईचे रोपे तयार करण्यासाठी दरवर्षी पारंपरिक पद्धतीने शेतकरी राब भाजणी करतात. त्यासाठी शेतकरी गवत, पालापाचोळा गोळा करून जमीन भाजून निघून रोपे बहरावी यासाठी शेतकऱ्यांची ही धडपड असते; पण पावसाने या सर्व कामांना फटका बसला आहे.
....
खरीप हंगामासाठी राब भाजणीचे काम सुरू केले होते. भाजणीची संपूर्ण तयारी झाली होती; मात्र आठवड्यापासून रोजच पाऊस येत असल्याने, हे सर्व साहित्य भिजले आहे. त्यामुळे मेहनत आणि खर्च वाया गेला आहे. तसेच आंबा आणि काजूचे मोठे नुकसान झाले आहे.
- उमाकांत हमरे, शेतकरी, खोडाळा
....
‘आम्हालाही भरपाई द्या’
अवकाळी पावसाने रचून ठेवून पेटवलेल्या वीटभट्ट्या अर्धवटच भाजल्या गेल्या आहेत. तसेच तयार केलेला कच्चा माल भिजला असून सर्वत्र चिखलच झाला आहे. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कच्चा माल वाचवण्यासाठी त्यावर प्लास्टिक टाकून वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. शेतकऱ्यांप्रमाणे नुकसानग्रस्त वीटभट्टी चालकांना ही नुकसानभरपाई देऊन आम्हाला सावरावे, अशी मागणी वीटभट्टीचालक अनिल येलमामे यांनी केली.
....
मोखाडा : खरीप हंगामाच्या भाजणीसाठी शेतात रचून ठेवलेले गवत, पालापाचोळा पावसाने भिजला आहे.