
१५ वर्षांपासून फरार आरोपी गजाआड
मुंबई, ता. २४ : घरफोडीच्या गुन्ह्यात १५ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला जेरबंद करण्यात रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांना यश आले. आरोपीच्या हातावरील टॅटूवरून पोलिसांनी त्यास अटक केली. आरमुगम पल्लास्वामी देवेंद्र (वय ६३) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. भांडुप, अँटॉप हिल, सायन तसेच गुजरात येथील पोखारा पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत.
मुंबईतील न्यायालयाने आरोपीला फरार घोषित केले होते. आरोपीचा फोटो पोलिस रेकॉर्डवर नव्हता. तसेच आरोपी वारंवार पत्ते बदलून कल्याण, माहीम, भांडुप तसेच कामाच्या ठिकाणी कोठेही राहण्यास असल्याने त्याच्यापर्यंत पोहोचण्यास पोलिस पथकाला अडचणी निर्माण होत होत्या. दरम्यान, त्याच्या उजव्या हाताच्या मनगटावर टॅटू आढळून आला. तोच धागा पकडून पथकाने तपास सुरू केला. आरोपी हा प्रेक्षणीयस्थळी वावरत असल्याची माहिती मिळाली. त्यातूनच तो ‘मुंबई दर्शन’ मार्गावर चालक म्हणून काम करत असल्याच्या शक्यतेतून शोध सुरू केला. अखेर फोर्टस्थित ट्रॅव्हल एजन्सीला त्याची ओळख पटली. त्यावरून त्याला अटक करण्यात आली.