गोड्या पाण्यातील माशांना पसंती

गोड्या पाण्यातील माशांना पसंती

कासा, ता. २६ (बातमीदार) ः येथील सूर्या नदीच्या किनारी गोड्या पाण्यातील माश्यांना खवय्यांकडून चांगलीच मागणी येत आहे. ऊर्से म्हसाड येथील सूर्या नदीकाठी मासेमारी करून येथील मच्छीमार त्यांची विक्री करत आहेत. पाऊस पडेपर्यंतची तीन महिने ही मासेमारी केली जाते. येथील मासे चविष्ट असल्याने त्यांना चांगलीच मागणी येत आहे.

डहाणूतील धामणी, कवडास धरणातून सूर्या नदीत नेहमी पाणी वाहत असते. सूर्या नदीवर पाच ठिकाणी कोकण पद्धतीचे बंधारे बांधले असल्याने नदीमध्ये पाणी मुबलक प्रमाणात साठलेले असते. त्यामुळे चार-आठ लाकडांचा आधार घेत नदीमध्ये पहाटेपासून दिवसभर येथे मासेमारी केली जाते. दिवसभरात पाच ते सहा किलो विविध लहान मासे, कोळंबी असे चविष्ट गोड्या पाण्यातील मासे मच्छीमारांच्या जाळ्यात सापडतात. त्यातून अनेक मच्छीमार आपला उदरनिर्वाह करतात.

समुद्रातील खाऱ्या पाण्यातील मासे खाण्यापेक्षा गोड्या पाण्यातील मासे खाण्याकडे खवय्यांचा कल वाढत आहे. अनेक मासेप्रेमी खवय्ये तर पहाटे पहाटे या नदीकिनारी येऊन मासे पकडणारे ज्या भागात असतील तेथे येऊन मासे खरेदी करीत आहेत. ३०० ते ४०० रुपये किलो दराने तर काही वेळा वाट्यावर हे मासे विकले जात आहेत. गोड्या पाण्यातील मासे भरपूर प्रथिनयुक्त असतात. हे मासे पचायला हलके असून आरोग्यास आवश्यक असणारे जीवनसत्व मुबलक प्रमाणात यात असते. तसेच, या माशांच्या तेलात पॉली अन सेक्युरटी ॲसिड जास्त असल्यामुळे यांच्या सेवनाने हृदयरोगास प्रतिबंध करण्यास उपयोग होतो,असे डॉक्टर सांगतात. त्यामुळेही खवय्यांची याला पसंती मिळत आहे.
-----
आम्ही तीन महिने कुटुंबासह या नदीकिनारी दरवर्षी येऊन झोपडी तंबू तयार करून राहत असतो. पहाटे लवकर उठून नदीतील मासे पकडून विकून येणाऱ्या पैशावर उदरनिर्वाह करीत असतो. बहुतेक मासे नदी किनारीच विकले जात असल्याने गावात विकावयास जाण्याची गरज पडत नाही. जास्त पैसे मिळाले की पुढील काळात वापरण्यासाठी उपयोगी पडतात. आमचा हा पिढीजात चालत व्यवसाय आहे.
- सुनील व सुनीता हाडल, मच्छिमार.
---
गोड्या पाण्यातील विविध जातीचे मासे खुप चविष्ट असल्याने आम्ही नदीकिनारी येऊन विकत घेत असतो. हे मच्छीमार ज्या भागात येतात त्या परिसरात जाऊन ताजे मासे विकत घेत असतो. समुद्रातील माशांपेक्षा खूप चविष्ट असल्याने त्याला मागणी जास्त आहे.
- महेश भोये, खवय्या, बांधघर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com