मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : गुढीपाडव्याच्या सभेत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर सभा घेत बसण्यापेक्षा राज्यातील विकासाचे काम करा, अशी टीका केली होती. त्यानंतर रविवारी (ता. २६) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानावर सदिच्छा भेट घेतली. या वेळी राज यांची पत्नी शर्मिला, पुत्र अमित, तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

मुंबईतील महानगरपालिका निवडणुका लवकरच होऊ घातल्या आहेत. त्यापूर्वीच एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची भेट होत असल्याने या भेटीमागे काय कारण आहे, यावर अनेक चर्चा रंगल्या आहेत. रविवारी शिंदे यांच्यासाठी ठाकरे यांच्या घरी खास जेवणाच्या मेजवानीचा बेत आखण्यात आल्याचीही चर्चा आहे. तसेच महापालिका निवडणुकीतील समीकरणसुद्धा बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गुढीपाडव्याच्या जाहीर सभेत राज ठाकरे यांनी मुंबईतल्या सुशोभीकरणाच्या कामावर टीका केली होती. सुशोभीकरणाची मोहीम ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पेट प्रोजेक्ट मानला जातो. या सभेत माहीम समुद्रातील अनधिकृत बांधकामाचा मुद्दा राज्य सरकारच्या निदर्शनास आणून दिला होता. सरकारने हे अनधिकृत बांधकाम त्वरित हटवावे, अशी त्यांनी जाहीर भूमिकासुद्धा घेतली होती. त्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत मुंबई महापालिकेने हे अनधिकृत बांधकाम हटवले होते. यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री शिंदे आणि राज ठाकरे यांची भेट झाली. या वेळी राज यांनी मुख्यमंत्र्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
---
केवळ सदिच्छा भेट...
आजची भेट केवळ सदिच्छा भेट होती, यामध्ये कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेटीनंतर स्पष्ट केले. राज ठाकरे यांनी भोंग्याचा आवाज, मनसे कार्यकर्त्यांवरील गुन्हे याबाबत चर्चा केली. नियम, कायदे पाळले जावे, अशी राज ठाकरे यांची भूमिका आहे. सरकारची तीच भूमिका आहे. आमचे सरकार सर्वसमावेशक सरकार आहे. कुणावर सूडबुध्दीने, एकतर्फी कारवाई करणार नाही. खेडच्या सभेत केवळ भाषण देण्यासाठी नव्हे तर विकासासंदर्भातील काही निर्णय घेण्यासाठी गेलो होतो, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com