महालक्ष्मी यात्रेसाठी प्रशासन सज्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महालक्ष्मी यात्रेसाठी प्रशासन सज्ज
महालक्ष्मी यात्रेसाठी प्रशासन सज्ज

महालक्ष्मी यात्रेसाठी प्रशासन सज्ज

sakal_logo
By

कासा, ता. २७ (बातमीदार) : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या डहाणू तालुक्यातील महालक्ष्मी देवीची यात्रा ६ एप्रिलपासून सुरू होणार आहे. कोरोनानंतर प्रथमच भरणाऱ्या या यात्रेत मोठ्या संख्येने भाविक येणार असून या यात्रेच्या तयारीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. यात्रेत भाविकांच्या सोयीसुविधा व तयारीसंदर्भात मंदिर ट्रस्ट कार्यालयात उप जिल्हाधिकारी तथा प्रांत अधिकारी संजिता महापात्र यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागांचे अधिकारी, ट्रस्ट तसेच ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत सोमवारी तिसरी आढावा बैठक पार पडली.
डहाणूतील महालक्ष्मी यात्रा सलग १५ दिवस चालणारी असून जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा आहे. या यात्रेला राज्यासह गुजरातमधून लाखो भाविक येथे येत असतात. त्यामुळे भाविकांच्या सोयी-सुविधा, कायदा व सुव्यवस्था चोख राहावी, तसेच सुरक्षेच्या दृष्टीने ही आढावा बैठक पार पडली. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून यात्रा परिसरातील स्वच्छतागृह, कचरा समस्या, पिण्याचे पाणी, यात्रा परिसरातील वाहतूक कोंडी, तसेच यात्रेत दुकानांची गर्दी, यात मध्ये सोडण्यात येणारा रस्ता यावर चर्चा करण्यात आली.
यात्रेदरम्यान चोख पोलिस बंदोबस्त ठेवला जाणार असून चार ठिकाणी टेहळणी पथके तैनात असणार आहेत. या बैठकीत सुरुवातीला ट्रस्टतर्फे केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली. या आढावा बैठकीस संजिता महापात्र यांच्यासह नायब तहसीलदार कुवर, कासा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक श्रीकांत शिंदे, सहायक अधिकारी संदीप पाटील, सर्व सरकारी विभागांचे अधिकारी, ट्रस्टचे अध्यक्ष संतोष देशमुख, दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
....
यंदा मुखदर्शनाची व्यवस्था
यात्रेला मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने या वर्षी देवीच्या मुखदर्शनाची व्यवस्था केली जाणार आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने ८० सिक्युरिटी गार्ड, २० स्वयंसेवक तैनात करण्यात येणार आहेत. या वर्षी यात्रा कालावधीत व्हीव्हीआयपी दर्शन बंद ठेवण्यात आले आहे. तसेच दिव्यांगांसाठी दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे.
....
यात्रेत गर्दी होत असल्याने रस्ता रुंदीकरणासाठी अतिक्रमण हटविले जाईल. तसेच अग्निशमन वाहन, रुग्णवाहिका, मोबाईल टॉयलेटसुद्धा उपलब्ध केले जाणार आहेत.
- संजिता महापात्र, उपजिल्हाधिकारी
....
यात्रेत कोणतीही दुर्घटना किंवा वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी नियोजन केले आहे. आखून दिलेल्या रेषेपलीकडे दुकान लावल्यास कारवाई केली जाईल.
- श्रीकांत शिंदे पोलिस उपनिरीक्षक, कासा