भुयारी पादचारी मार्गावर घाणीचे सामाज्‍य

भुयारी पादचारी मार्गावर घाणीचे सामाज्‍य

जोगेश्वरी, ता. २८ (बातमीदार) ः अंधेरी पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या एकमेव पादचारी भुयार मार्गात सध्‍या घाणीचे सामाज्‍य पसरले आहे. येथील कचऱ्याचे डबे भरले असून येथील कचरा वेळेत उचलला न गेल्‍याने येथून ये-जा करणाऱ्या पादचारी नागरिकांना याचा त्रास सहन कराव लागत आहे. अंधेरी पूर्व-पश्चिम जोडणारा हा एकमेव पादचारी भूयारी मार्ग असल्‍याने येथून सकाळ-संध्‍याकाळ नेहमी वर्दळ असते. दिवसभरात लाखो नागरिक येथून मार्गक्रमण करत असतात; मात्र येथील घाणीमुळे नागरिक त्रस्‍त झाले आहेत. या परिसरातील व्‍यापारी येथे कचरा टाकत असल्‍याचा आरोप नागरिक करत असून त्‍यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. तसेच या मार्गातील कचरा साफ होत नसल्‍याने नागरिकांच्‍या आरोग्‍याचाही प्रश्‍न निर्माण झाला आहे. पालिकेने त्‍वरित कार्यवाही करून दिलासा द्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

मनाचे श्‍लोक पाठांतर स्‍पर्धेत रामेश्‍वर विद्यामंदिरची बाजी
मुंबई ः मुंबई महापालिका शिक्षण विभाग व खासगी प्राथमिक अनुदानित शाळा मराठी माध्यम यांच्‍यातर्फे आयोजित श्री मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धेत सांताक्रूझ, पूर्व येथील रामेश्वर विद्यामंदिर या शाळेने बाजी मारली आहे. या शाळेतील सर्व इयत्तांच्या गटांना विजयचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. इयत्ता पहिलीचा प्रथम क्रमांक, इयत्ता दुसरीचा द्वितीय क्रमांक, इयत्ता तिसरीचा प्रथम क्रमांक आणि इयत्ता चौथीचा प्रथम क्रमांक आल्याबद्दल मुख्याध्यापिका मानसी म्हात्रे, मार्गदर्शक शिक्षक आणि पालक या सर्वांचे विशेष कौतुक करण्यात आले. श्री मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धा नुकतीच राम गोपाल केडिया प्राथमिक शाळा, जोगेश्वरी पूर्व येथे पार पडली. विभागीय शिक्षण निरीक्षिका भारती भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा समितीचे सदस्य टक्के, मानसी म्हात्रे, रचना पवार आदींच्या माध्यमातून ही स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली. स्पर्धेसाठी उपरोक्त विभागातील एकूण दहा शाळांनी भाग घेतला होता. तसेच नामवंत शाळांतील शिक्षक या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून लाभले होते. स्पर्धेत प्रत्येक इयत्तेच्या पाच विद्यार्थ्यांच्या समूहाला मनाचे श्लोक सादर करण्याची संधी देण्यात आली.

मुलुंडमध्ये श्रीरामजन्म सोहळा
मुलुंड, ता. २८ (बातमीदार) ः ‘मी मुलुंडकर प्रतिष्ठान’तर्फे सातत्याने सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. याच अनुषंगाने मुलुंड पूर्वेतील हनुमान चौक येथे गुरुवारी (ता. ३०) श्रीरामनवमी निमित्त दुपारी १२ वाजता श्रीरामजन्म उत्सव आणि संध्याकाळी ६.३० वाजता पालखीचे आयोजन करण्यात आले आहे. या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी सुरेख सणासुदीचा पेहराव परिधान करणे आवश्यक आहे आणि येताना सोबत शक्यतो झांज किंवा टाळ आणावेत. तसेच लहान मुलांनी विशेष वेशभूषा परिधान करावी, असे आवाहन मी मुलुंडकर प्रतिष्ठानच्या मयूरा बाणावली यांनी केले आहे. श्रीरामाची पालखी संध्याकाळी हनुमान चौक येथून रुची हॉटेल ते स्टेशनमार्गे प्रस्थान करणार असून त्याची सांगता हनुमान चौक येथे होणार असून सर्व नागरिकांनी यामध्‍ये सहभागी व्हावे, असे आवाहनही मयूरा बाणावली यांनी केले आहे.

क्षयरोग दिनानिमित्त जनजागृती
चेंबूर, ता. २८ (बातमीदार) ः जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधून झेन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल व एम पश्चिम पालिका आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने क्षयरोग जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी रुग्णालयात चर्चासत्र पार पडले. या वेळी क्षयरोगाची लक्षणे, प्रकार, कारणे, निदान आणि प्रतिबंध याबद्दल डॉ. विक्रांत शहा यांनी मार्गदर्शन केले. तसेच नागरिकांना नियमित औषध घेणे, पुरेशी विश्रांती घेणे, मास्कचा वापर करणे, स्वच्छता राखणे आवश्‍यक असल्‍याचे समजावून सांगितले. या वेळी रुग्ण व उपस्थित मान्यवर यांचा सत्कार करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com