कल्याण रेल्वेस्थानकातील सलूनला विरोध

कल्याण रेल्वेस्थानकातील सलूनला विरोध

कल्याण, ता. २८ (बातमीदार) ः कल्याण रेल्वेस्थानकातील फलाट क्रमांक एकजवळील जुने शौचालय तोडून तिथे सलून सुरू करण्यात आले आहे. याला कल्याण-कासारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेने विरोध केला आहे. स्थानकात प्रवाशांसाठी सुविधा उपलब्ध करून द्या, अशी मागणी त्यांनी केली आहे.

कल्याण रेल्वे स्थानक हे देशात सर्वात गर्दीचे तिसरे रेल्वे स्थानक आहे. या स्थानकात ७ फलाट असून लोकल आणि मेलमधून प्रतिदिन सुमारे ६ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. फलाट क्रमांक एकवर मुख्य तिकीट घराजवळ पूर्वी सार्वजनिक शौचालय होते. तेथे दुर्गधी होत असल्याने डिलक्स शौचालय झाले. तेही तोडण्यात आले. काही दिवस या ठिकाणी मोकळी जागा असल्याने मुंबई सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या धर्तीवर एसी सलून सुरू करण्यात आली. यावर प्रवाशांकडून चांगलीच टीका होत आहे.

कल्याण रेल्वे स्थानकात गर्दीचे नियंत्रण करणे अवघड होत आहे. फलाट व ट्रेनचे पायदान यातील जीवघेणी पोकळी, अस्वच्छ पाणवठे, कुत्रे, भिकारी गर्दुल्ले यांचा मुक्त वावर, अपुरी सुरक्षा, अपुरे मनुष्यबळ, अरुंद जिने, उद्‍घोषणेतील गोंधळ, अनधिकृत फेरीवाले व रिक्षावाल्यांचा स्थानक परिसरात उच्छाद, महिलांकरिता सीएसएमटी दिशेला स्वच्छतागृहांचा अभाव या समस्या वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. असे असताना रेल्वे प्रशासनाने इथे फक्त पैशांचा विचार करून सलून सुरू केल्याची टीका प्रवाशांकडून होत आहे; तर सलूनला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे एका रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
---
फलाटावर फिरण्यासाठी जागा नाही. नागरिकांना शौचाला जाण्याची सोय नाही; मात्र दाढी करण्याची सुविधा काय देता? मूलभूत सुविधा द्या.
- प्रथमेश वाघमारे, प्रवासी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com