शेडअभावी उन्हाचे चटके

शेडअभावी उन्हाचे चटके

श्रीवर्धन, ता. २८ (बातमीदार) : तालुक्यातील बोर्लीपंचतन येथे सुसज्ज बसस्थानक व्हावे, अशी मागणी सातत्याने करण्यात येत आहे. मात्र, प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने सर्वसामान्य प्रवाशांना एसटीची वाट रखरखत्या उन्हात चटके सोसत करावी लागत आहेत. येत्या काही दिवसांत शेड झाली नाही, तर पावसाळ्यातही प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे.
बोर्लीपंचतन शहरात २०२१ मध्ये न्यायालयाच्या आदेशानुसार अतिक्रमणे हटवण्याची कारवाई करण्यात आली. त्यामुळे जुन्या बसस्थानकाच्या मोकळ्या भूखंडावर नव्याने स्थानक बांधण्यात यावे आणि प्रवाशांना सुविधा मिळावी, अशी मागणी दोन वर्षांपासून प्रवाशांकडून होत आहे. बोर्लीपंचतन बसस्थानकाला दिघी विभागातील अनेक गावे; तसेच दिवेआगर, हरिहरेश्वर, दिघी - जंजिरा अशी पर्यटन स्थळे एसटी वाहतुकीने जोडली आहेत. येथे दिवसातून ७४ बसगाड्यांची नोंद होते. मुंबई, पुणे शहरांसह गाव खेड्यातील नागरिक प्रवास करत आहेत. बोर्लीपंचतन मध्यवर्ती ठिकाण असल्याने येथे शेकडो विद्यार्थी व प्रवासी भर उन्हात बसची वाट बघत रस्त्यावर ताटकळत उभे असतात. तसेच विद्यार्थ्यांना एसटी पास संदर्भातील माहिती अधिकाऱ्याची नेमणूक नसल्याने उपलब्ध होत नाही. यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे महामंडळाचा सर्व कारभार वाऱ्यावर आहे. दोन वर्षांपासून बसस्थानकाची होत असलेली मागणी अद्याप पूर्ण झाली नसल्याने प्रवासी संताप व्यक्त करत आहे.

मासेविक्रेत्यांमुळे वाहतूक कोंडी
बोर्लीपंचतन येथील अवैध बांधकामे हटवण्यात आली आहेत; मात्र याच जागेत आता बिनदिक्कतपणे मासेविक्री सुरू आहे. त्यामुळे मुख्य थांब्यावरच वाहतूक कोंडी होते. त्यामुळे एसटी प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

शेडसाठी ग्रामस्थ एकवटले
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन शहरातील बसस्थानकाचा प्रश्न प्रशासनाच्या दिरंगाईमुळे दोन वर्षांनी सुटत आहे. मात्र, आता नव्याने येत असलेल्या अडथळ्यांसमोर जाण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेत रविवारी (ता. २६) बैठक घेतली. बसस्थानकाला आमदार फंडातून ३ लाख देण्याची तरतूद आमदार अदिती तटकरे यांनी केली आहे. त्यामुळे एसटी निवारा शेडची उभारणी जुन्याच ठिकाणी मोकळ्या भूखडांत करण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थच एकवटले आहेत. पुढील लढाई ही एकत्रित लढण्याची तयारी दर्शवली आहे.

ग्रामस्थांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. बोर्लीपंचतन एसटी शेड बनवण्यासाठी आम्ही देखील आग्रही आहोत. यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. स्थानिक महिला, वृद्ध व विद्यार्थ्यांचा विचार करून एसटी महामंडळाकडून शेड बांधण्यात येईल आणि उन्हापावसात होणारे हाल थांबवता येतील.
- शर्वरी लांजेकर, आगार प्रमुख, श्रीवर्धन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com