मुंबईतील चार वॉर्ड्स ‘एच३एन२’च्या विळख्यात

मुंबईतील चार वॉर्ड्स ‘एच३एन२’च्या विळख्यात

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ ः मुंबईत ‘एच३ एन२’ आणि ‘एच१ एन१’ च्या रुग्णांची संख्या वाढल्याचे सांगितले जात आहे. गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत मार्च महिन्यात सर्वाधिक एच३एन२ चे रुग्ण सापडले आहेत. आतापर्यंत नोंद केलेल्या रुग्णांपैकी एकूण १४ रुग्ण कस्तुरबा रुग्णालयात दाखल आहेत. त्यापैकी ९ रुग्ण ‘एच३ एन२’चे आहेत; तर पाच रुग्ण ‘एच१ एन१’ आहेत. या सर्व रुग्णांची प्रकृती ठीक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

मुंबईत जानेवारी महिन्यापासूनच ‘एच१एन१’ आणि ‘एच३ एन२’ चे रुग्ण सापडू लागले होते. एच१एच १च्या ११२ रुग्णांची नोंद पालिकेने आतापर्यंत केली आहे. ११२ पैकी निम्मे रुग्ण हे एकट्या मार्च महिन्यात सापडले. मुंबईचे सध्याचे वातावरण हे व्हायरससाठी अनुकूल आहे. शिवाय, वातावरणाच्या बदलातून अनेक नागरिक आजारी पडत असल्याचे चित्र आहे. या दोन्ही आजारांचे रुग्ण जरी शहरात वाढत असले, तरी एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याची माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली.
....................................
महिना एच१एन१ एच३एन२ एकूण रुग्ण
जानेवारी १८ १ १९
फेब्रुवारी ३९ ७ ४६
मार्च ५५ २१ ७६
एकूण ११२ २९ १४१
..................
हे चार वॉर्ड हॉटस्पॉट
पालिकेच्या अहवालानुसार ए, डी, एफ दक्षिण, जी दक्षिण हे चार हॉटस्पॉट असून या वॉर्डमध्ये सध्या जास्तीत जास्त केस आढळत आहेत. या चार वॉर्डांत पालिकेने विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना संबंधित वॉर्ड अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
..................
कस्तुरबा, सायन, केईएम, कूपर आणि नायर रुग्णालयांसह १७ उपनगरीय रुग्णालयांमध्ये आयसोलेशन बेडच्या स्वरूपात प्रवेश सुविधा उपलब्ध करून दिली गेली आहे. या रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटरी सपोर्टची सुविधा उपलब्ध आहे. तसेच सर्व प्रमुख खासगी रुग्णालयांमध्येही इन्फ्लूएंझा पॉझिटिव्ह रुग्णांच्या उपचारांसाठी सुविधा सुरू केल्या गेल्या आहेत.
.................
नागरिकांना सूचना
नागरिकांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, शिंकताना आणि खोकताना नाकावर रुमाल घेणे, ताप, घसादुखी, सर्दी, खोकला, अंगदुखी यांसारखी लक्षणे आढळल्यास पूर्ण आराम करा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com