नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्र लवकरच कलाप्रेमींच्या सेवेत

नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्र लवकरच कलाप्रेमींच्या सेवेत

मुंबई, ता. २९ ­ः बीकेसीमधील रिलायन्स जिओ सेंटर परिसरातील विस्तीर्ण नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक कला केंद्र लवकरच रसिकांच्या सेवेसाठी खुले होत आहे. येथील सभागृहात लहान-मोठे सांस्कृतिक-संगीत-गायन कार्यक्रम, नृत्य-नाट्य, कला प्रदर्शन, चित्र प्रदर्शन आदी अनेक प्रकारची सांस्कृतिक मेजवानी रसिकांना मिळू शकेल.
चार मजली कला केंद्राच्या बांधकामात अनेक वैशिष्ट्ये असून कलाकार आणि प्रेक्षक या दोघांसाठीही भारतीय कला आणि संस्कृती यांचे दर्शन घडवणारे मोठे व्यासपीठ आम्ही उपलब्ध करीत आहोत, असे केंद्राच्या संस्थापक आणि अध्यक्ष नीता अंबानी यांनी सांगितले. येथे एक एप्रिलपासून संगम हे पहिले प्रदर्शन आयोजित केले जाईल, हा संस्कृती आणि स्वप्नांचा संगम असल्याचे सांगितले जात आहे.

असे असेल केंद्र
सुमारे दोन हजार प्रेक्षक क्षमतेच्या मुख्य सभागृहात १४ ड्रेसिंग रूम, मेकअप रूम, ग्रीन रूम, वॉर्मअप रूम आहे, तसेच या सभागृहाच्या बाल्कनीत विशेष असे १८ कौटुंबिक कक्षदेखील आहेत.
अडीचशे प्रेक्षक क्षमतेच्या स्टुडिओ थिएटरमध्ये लहान सांस्कृतिक नृत्य-नाट्य-गायन आणि छोटे कार्यक्रम आयोजित करता येतील. या सर्व ठिकाणी आधुनिक डॉल्बी सिस्टीम, तसेच नयनरम्य लाइटिंग आणि अन्य सर्व आधुनिक सुविधाही उपलब्ध असतील. तळमजल्यावर ३५ हजार चौरस फुटांचे प्रदर्शन सभागृह असून येथेही वेगवेगळी विक्री प्रदर्शने आयोजित करता येतील.
मुख्य सांस्कृतिक केंद्र हे आंतरराष्ट्रीय म्युझियमच्या निकषानुसारच बनवले आहे. येथे मुंबईचे तत्त्वज्ञान दाखवणारी भित्तीचित्रे आणि शिल्प आहेत. प्रवेश करताना समोरच असलेली भित्तीचित्रे आपल्याला उपनगरी लोकल प्रवासाची आठवण करून देतात.


मुलगी इशा, मी आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांनी गेली अनेक वर्षे या प्रकल्पासाठी भरपूर मेहनत घेतली आहे. कलाकार, प्रेक्षक, पाहुणे, तसेच स्वप्न पाहणारे कलाकार आणि निर्माते या सर्वांची स्वप्न पूर्ण करणारे हे केंद्र आहे. वर्षभरात यात आणखीही चांगले बदल होतील. भारतीय कलांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी आणि भारतीय कलाकारांच्या प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी हे व्यासपीठ अत्यंत उपयुक्त ठरेल. किंबहुना हे व्यासपीठ भारतीय आणि जागतिक कलाकारांना एकत्र आणायला उपयुक्त ठरेल.
- नीता अंबानी, संस्थापक आणि अध्यक्ष, सांस्कृतिक कला केंद्र

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com