वरळी कोळीवाड्यात घागर रिकामीच

वरळी कोळीवाड्यात घागर रिकामीच

प्रभादेवी, ता. २९ (बातमीदार) : पिण्यासाठी पुरेसे पाणी मिळावे यासाठी स्वतःच्या खर्चातून पाईपलाईन आणि पाणी चढवण्यासाठी मशीनसाठी लाखभर खर्च केला, मात्र मुबलक पाणीच येत नसल्याची व्यथा वरळी कोळीवाड्यातील स्थानिकांनी मांडली आहे. वरळी कोळीवाड्यात पाणीटंचाई होत असल्याच्या कारणास्तव माजी महापौर हेमांगी वरळीकर यांनी मंगळवारी पालिका कार्यालयावर हंडा मोर्चा काढला होता. वरळी कोळीवाड्यातील काही भागांत कमी दाबाने पाणी येते, मात्र काही भागांत फक्त एकच तास पाणी येत असल्याची कैफियत वरळीतील नागरिकांनी ‘सकाळ’कडे मांडली. पाण्याची मोठी जलवाहिनी जिथून आलेली आहे तेथून पाणी चढवण्यासाठी मशीनदेखील बसवली, त्‍यासाठी लाखभर रुपये खर्च केले. मात्र गेले कित्येक महिने पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याचे रहिवाशी सुनील सकट यांनी सांगितले.

या भागात टंचाई
वरळी कोळीवाड्यातील काटकर लेन, दामोदर, क्रांती गल्ली, किल्ला, डुक्कुर गल्ली, गोल्फादेवी, नवजीवन लेन अशा काही भागांत पाणीटंचाई असून कमीदाबाने पाणीपुरवठा होतो. अनेकदा फक्त एकच तास पाणी येते; तसेच सुरुवातीला अर्धा तास पाणी गढूळ येते, त्यामुळे पाण्याचे हाल होत असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.

१५ कुटुंबांमध्ये एक नळ
वरळी कोळीवाड्यात दाटीवाटीने वस्ती वसली आहे. प्रत्येक लेनमध्ये १५ कुटुंबांमध्ये एक नळ देण्यात आला आहे, मात्र पाणी कमी येत असल्याने, तसेच ते कमी वेळ येत असल्याने पाणी भरून होत नाही. या समस्येवर त्वरित तोडगा काढावा, असा सूर येथील रहिवाशी आळवीत आहेत.

पाणी संध्याकाळी सात वाजता सोडण्यात येते व साडेसात वाजता जाते. पुन्हा रात्री दहा वाजता सोडण्यात येते, ते अकरा वाजेपर्यंत असते. एवढ्या कमी वेळेत पाणी कसे भरून होणार?
- शैला पोडमाल, रहिवासी

पाणी गढूळ तर येतेच, तेही एकच तास सोडण्यात येते. शिवाय एका नळावर १५ कुटुंबे पाणी भरतात. एवढ्या कमी वेळेत मुबलक पाणी मिळत नसल्याने दररोज भांडणेही होत आहेत.
- मीनाक्षी खवले, रहिवासी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com