रेटींगच्या नावाने तरुणीची सहा लाखांची फसवणूक

रेटींगच्या नावाने तरुणीची सहा लाखांची फसवणूक

अंधेरी, ता. ३० (बातमीदार) ः रेटिंगच्या नावाने तरुणीची सहा लाखांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार वांद्रे परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी नरेशकुमार आणि लक्ष्मी नाव सांगणाऱ्‍या दोन सायबर ठगांविरुद्ध वांद्रे पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
तक्रारदार तरुणी ही वांद्रे येथे राहत असून सध्या शिक्षण घेत आहेत. १९ मार्चला तिला नरेशनकुमार नावाच्या एका व्यक्तीकडून एक मेसेज आला होता. त्यात तिला वेबसाईट रेटिंग देणे आणि त्यावर घरबसल्या पैसे कमवा असे नमूद करण्यात आले होते. त्यामुळे तिने मेसेजमधील लिंक ओपन केली होती. त्यात तिला काही नियम दिसून आले. ते नियम समजून तिने टेलिग्राफ ॲप सुरू करून तिचे एक अकाऊंट उघडले होते. रेटिंगदरम्यान तिला काही टास्क देण्यात आले होते. तेराहून अधिक टास्क पूर्ण केल्यानंतर तिच्या अकाऊंटमध्ये तेरा हजार रुपये जमा झाले होते. त्यानंतर तिला विविध कारणे सांगून गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करण्यात आले होते. २६ मार्चपर्यंत तिने सुमारे दीड लाखांची गुंतवणूक केली होती; मात्र नंतर तिला ॲपमधून काही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे तिने नरेशकुमार आणि तिच्याशी चॅटवर बोलणाऱ्‍या लक्ष्मीला कमिशनची रक्कम मिळत नसल्याचे सांगून तिचे पैसे परत करण्यास सांगितले. या वेळी त्यांनी तिला तीस रेटिंग दिल्याशिवाय तिला तिचे पैसे काढता येणार नाहीत. अकाऊंटमधून पैसे काढण्यासाठी तिला ३ लाख ३२ हजार ९०० रुपये जमा करण्यास सांगितले. त्यामुळे तिने ती रक्कम जमा केली होती; मात्र ही रक्कम जमा करूनही तिला पैसे मिळाले नाहीत. उलट ते दोघेही तिला आणखी आठ लाख रुपये जमा करण्यास सांगत होते. अशा प्रकारे या दोघांनी रेटिंगच्या नावाने पाच दिवसांत तिची सहा लाखांची फसवणूक केली होती. फसवणुकीचा हा प्रकार निदर्शनास येताच तिने वांद्रे पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com