Nitin Gadkari
Nitin Gadkari sakal

महामार्ग आंतरराष्ट्रीय दर्जाचा होणार; नितीन गडकरी

नितीन गडकरी यांची ग्वाही; डिसेंबरअखेर पूर्णत्वास

नवीन पनवेल : कोकणच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम डिसेंबरअखेर पूर्णत्वास येईल. नवीन वर्षात नागरिकांसह पर्यटकांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या महामार्गावर प्रवास करता येईल, असे मत केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. पनवेल-इंदापूर यादरम्यान महामार्गाच्या काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते गुरुवारी (ता. ३०) झाले, त्या वेळी ते बोलत होते.

खारपाडा टोल प्लाझा येथील कार्यक्रमाला रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार सुनील तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रवीशेठ पाटील, आमदार महेश बालदी, धैर्यशील पाटील आदी उपस्थित होते.

या वेळी नितीन गडकरी यांनी भाषणामध्ये मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत खंत व्यक्त केली. भूसंपादनामधील अडथळे, ठेकेदाराचा उदासीनपणा आणि वेगवेगळ्या विभागांकडून परवानग्यांसाठी लागलेला विलंब यामुळे महामार्गाचे काम गेल्या दहा वर्षांत पूर्ण होऊ शकले नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले; मात्र आता संपूर्ण महामार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे ते म्हणाले.

पळस्पे ते कासू यादरम्यानचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या अनुषंगाने राज्य व केंद्र सरकारचे लक्ष आहे. डिसेंबर २०२३ पर्यंत रायगड जिल्ह्यामध्ये ५० हजार कोटींची कामे पूर्णत्वास येतील आणि काही प्रगतिपथावर असतील, असेही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांनी सांगितले. खासदार सुनील तटकरे यांनी आपल्या भाषणामध्ये चौफेर फटकेबाजी केली. श्रीरंग बारणे आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

पाण्यातून वाहतूक आवश्यक
कोकणचा कॅलिफोर्निया करण्याच्या अनुषंगाने पाण्यातून वाहतूक करणे आवश्यक आहे. पाण्यातून उडणाऱ्या विमानाची सेवा सुरू करण्याचे संकेतही त्यांनी दिले. रस्ते विकास महामंडळाला दिलेल्या रस्त्यांची कामेसुद्धा शंभर टक्के पूर्ण झाली पाहिजेत. प्रस्तावित प्रकल्पांना निधीची कमतरता पडू दिली जाणार असल्याचेही नितीन गडकरी म्हणाले.

पर्यायी इंधनाचा वापर गरजेचा
प्लास्टिक, रबर आणि इतर कचऱ्याचा वापर रस्ते बनवण्यासाठी करण्याची सूचना त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना दिली. त्याचबरोबर प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टिकोनातून मिथेलॉन हायड्रोजन यासारख्या इंधनाचा वापर भविष्यात होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

रायगड जिल्ह्याच्या विकासात राजकारण नको!
पालकमंत्री उदय सामंत यांनी आपल्या भाषणामध्ये गुवाहाटी आणि काश्मीरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कामाची छाप कशाप्रकारे पडलेली आहे याचे उदाहरणासहित स्पष्टीकरण दिले. भविष्यात रायगड जिल्ह्यामध्ये विकास काम करताना कोणतेही राजकारण येऊ न देण्याची ग्वाही त्यांनी दिली. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनीही आपल्या भाषणामध्ये रायगड जिल्ह्याचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकार सकारात्मक भूमिका घेत असल्याचे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com