कृषी विभागाच्या जागेत सेंद्रिय शेतीला बहर

कृषी विभागाच्या जागेत सेंद्रिय शेतीला बहर

प्रसाद जोशी ः वसई
प्रधानमंत्री यांच्या संकल्पनेतून साकारलेले सकस अन्न व भाजीपाला ग्राहकांना मिळावा म्हणून शेतकऱ्यांनी सेंद्रिय, नैसर्गिक शेतीचा अवलंब करावा हा उद्देश बाळगला जात आहे. याच धर्तीवर पालघर जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचा प्रयोग यशस्वी करत कृषी विभागाने शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली आहे. जिल्ह्यात हा पहिलाच प्रयोग आहे.

वसई तालुक्यातील पेल्हार येथे कृषी विभागाच्या एक एकर जागेवर विविध पिकांची लागवड करण्यात आली आहे. यासाठी सेंद्रिय पद्धतीचा वापर करत शेतमळा फुलवला आहे. या ठिकाणी अनेक शेतकरी भेट देऊन माहितीदेखील संकलित करत आहेत. पालघर जिल्ह्यात कृषी विभागाच्या जागेत पहिल्यांदाच असा प्रयोग करण्यात आला आहे.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दिलीप नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी अधिकारी साईनाथ पाटील यांनी कृषी विभाग जिल्हा मध्यवर्ती फळरोपवाटिका पेल्हार या ठिकाणी भाजीपाला पिकाला अन्नद्रव्य म्हणून शेणखत व जीवामृताचा वापर केला आहे. तसेच रोग नियंत्रणासाठी पिवळे चिकट सापळे, फेरोमन ट्रॅप, दशपर्णी अर्क याद्वारे मका व असधी झेंडूची मिश्र लागवड करून भाजीपाला शेतमळा फुलवला आहे.
परिसरातील शेतकऱ्यांना सेंद्रिय, नैसर्गिक शेतीचे महत्त्व पटवून देण्यासाठी हा उपक्रम रावबण्यात आला आहे. तसेच प्रत्यक्ष यशस्वी लागवड बघायला मिळाल्यामुळे शेतकरी आपल्या शेतावरदेखील जीवामृत, दशपर्णी अर्क, घन जीवामृत, गांडूळ खत यांच्या माध्यमातून विषमुक्त भाजीपाला पिकवण्याचा संकल्प करीत आहेत. ससुनवघर येथील प्रगतशील शेतकरी श्रीकांत पाटील यांनी प्रक्षेत्रावर भेट देऊन आनंद व्यक्त केला व आपल्या शेतावर जिवामृताच्या माध्यमातून भाजीपाला पिकवण्याचा निर्धार केला.
कृषी विभाग सेंद्रिय शेतीसाठी मार्गदर्शन, माहिती देत असते, परंतु स्वतःच शेतमळा फुलवून प्रात्यक्षिक शेतकऱ्यांसमोर ठेवल्याने याचा फायदा घेण्यासाठी शेतकरी पुढे येतील, अशी आशा कृषी विभागाला आहे.
-------------------
कृषी विभागाच्या जागेत पेल्हार येथे विविध भाजीपाला, फळ पिकांची लागवड करण्यात आली. यासाठी सेंद्रिय वापर केला आहे. पिकेदेखील चांगली तयार झाली असून शेतकरी भेट देत आहेत.
- साईनाथ पाटील, कृषी अधिकारी, पेल्हार फळरोपवाटिका, जिल्हा मध्यवर्ती केंद्र
-------------------
पालघर हा कृषीसंपन्न जिल्हा आहे. येथे विविध पिकांची लागवड करून शेतकरी उत्पन्न घेत असतात. पेल्हार येथे कृषी विभागाने केलेली सेंद्रिय लागवड उल्लेखनीय आहे. या पद्धतीचा अवलंब शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात केला तर फायदेशीर ठरेल.
- राजेश पाटील, आमदार
---------------------
एक एकर क्षेत्रात लागवड
जिल्हा मध्यवर्ती फळरोपवाटिका पेल्हार येथील क्षेत्रावर कृषी अधिकारी साईनाथ पाटील यांनी रामचंद्र ढाक व कृषी सहायक दीपाली टोकरे यांच्या सहकार्याने सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून एक एकर क्षेत्रावर दुधी, कारली, शिराळा, टोमॅटो, वांगी, मिरची, मुळा, पालक, कोथिंबीर या भाजीपाला पिकांची प्रायोगिक तत्त्वावर यशस्वी लागवड केली.
------------------
एक लाख कलम निर्मितीचे उद्दिष्ट
जिल्हा मध्यवर्ती फळ रोपवाटिका पेल्हारच्या क्षेत्रावर सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात वनशेती अभियानांतर्गत मोहगणी, साग, रक्तचंदन, कदंब इत्यादी वनरोपांची २५ हजार रोपे; तर फुलशेतीमध्ये मोगऱ्याची २५ हजार रोपे तसेच आंबा, काजू, चिकू, जांभूळ या फळझाडांची ५० हजार कलमे अशी एकूण एक लाख कलम रोपांची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट कृषी विभागाने ठेवले आहे.
---------------------
वसई : कृषी अधिकारी साईनाथ पाटील आणि सहकारी रामचंद्र ढाक यांनी सेंद्रिय शेतमळ साकारला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com