डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी सुरक्षा वाढवणार

डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी सुरक्षा वाढवणार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ४ : उपचारात हेळसांड झाल्याचा आरोप ठेवत डॉक्टरांना मारहाणीच्या घटना पालिकेच्या रुग्णालयांमध्ये वारंवार घडत आहेत. अशा घटना घडू नयेत, यासाठी सीसी टीव्ही आणि अद्ययावत यंत्रसामुग्री खरेदी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सुरक्षा व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी १० कोटी रुपयांची उपकरणे लवकरच खरेदी करण्यात येणार आहेत.

पालिका आणि सरकारी रुग्णालयांमध्ये डॉक्टरांना मारहाणीच्या घटनांची दखल उच्च न्यायालयाने घेतली होती. या रुग्णालयांमध्ये सुरक्षा व्यवस्था पुरवा, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. वाढते हल्ले रोखण्याच्या मागणीसाठी ‘मार्ड’लाही संप करावा लागला होता. त्यांनीही तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. या प्रकरणाची पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी गंभीर दखल घेतली. पालिकेच्या मुख्य रुग्णालयात सुरक्षा व्यवस्था, कार्यक्षमता वाढविण्यासाठी आणि मनुष्यबळाची गरज कमी करण्यासाठी आधुनिक आणि तंत्रज्ञानयुक्त उपकरणांची खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी १० कोटी खर्च करणार असल्याचे आयुक्त चहल यांनी स्पष्ट केले आहे.

डॉक्टरांमध्ये असुरक्षिततेची भावना
रुग्णालयांत केवळ सुरक्षारक्षक ठेवून हा प्रश्न सुटणार नाही, कारण पोलिसांना असलेले अधिकार त्यांना नसतात. त्यामुळे रुग्णालयांत पोलिस सुरक्षा पुरवावीच लागेल आणि त्यात महिला पोलिसही असायला हव्यात. तसेच रुग्णालयांत सीसी टीव्ही कॅमेरेही असायला हवेत, जेणेकरून पोलिसांना देखरेख ठेवता येईल, असे मत न्या. अभय ओक व न्या. ए. ए. सय्यद यांच्या खंडपीठाने नोंदवले होते. त्यावेळी गृह व आरोग्य विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांसोबतही बैठका झाल्या होत्या; मात्र अजूनही पालिकेच्या मुख्य रुग्णालयांमधील डॉक्टरांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com