सेंद्रिय खत प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध

सेंद्रिय खत प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध

बदलापूर, ता. ११ (बातमीदार) ः शहरात गोळा होणाऱ्या कचऱ्यातून ओला कचरा वेगळा करून त्यातून सेंद्रिय खत बनवण्याचा प्रकल्प कुळगाव बदलापूर नगरपरिषद मांजर्ली येथील स्मशानभूमीत गेल्या अनेक वर्षांपासून राबवत आहे. मात्र, हा प्रकल्प हटवण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. या प्रकल्पामुळे परिसरात घाण झाली असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.

बदलापूर पश्चिम मांजर्ली येथील वैकुंठधाम या पालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या स्मशानभूमीत सात वर्षांपासून पालिकेने सेंद्रिय खत प्रकल्प राबवला आहे. यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र या प्रकल्पाची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. येथील यंत्रसामग्री मोडकळीस आली आहे. तसेच, हा प्रकल्प उघड्यावरच असल्याने इथे डास, माशा, कीटक यांची मोठ्या प्रमाणात पैदास झाली आहे. त्यामुळे आजुबाजूच्या परिसरात घाणीचे साम्राज्य तयार झाले असून नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
हा प्रकल्प स्मशानभूमीत आहे. या प्रकल्पाशेजारीच शौचालये आहेत. स्मशानभूमी अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना येथे उभे राहणेही अवघड होते. त्यामुळे हा प्रकल्प येथून हलवण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

---
गेल्या सात वर्षांपासून हा प्रकल्प या ठिकाणी राबवला जात आहे. प्रकल्पासाठी कोणतीही उपाययोजना न करता अस्ताव्यस्त स्वरूपात हा प्रकल्प येथे चालू आहे. त्यामुळे उग्र वास, माशा, डास यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला असून, याचा त्रास आम्हाला होत आहे. त्यामुळे हा प्रकल्प हटवण्याची मागणी करणारी अनेक पत्रे आम्ही पालिकला पाठवली आहेत. पण, पालिका मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे.
- ॲड. तुषार साटपे, स्थानिक ग्रामस्थ
---
ग्रामस्थांनी केलेली मागणी व या प्रकल्पाची एकंदरीत अवस्था पाहता, पालिका नक्कीच ग्रामस्थांच्या या प्रश्नावर तोडगा काढेल. सध्या वडवली भागातील कचराभूमीवर एकात्मिक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबवण्यासंदर्भात राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. याविषयी निर्णय झाल्यावर मांजर्ली स्मशानभूमीत असलेला हा सेंद्रिय खत प्रकल्प वडवली येथे लवकरच नेण्यात येईल.
- योगेश गोडसे, मुख्याधिकारी, कुळगाव बदलापूर नगरपरिषद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com