भर उन्हाळ्यात होत असलेल्या पाणी कपातीमुळे नागरिक हैराण

भर उन्हाळ्यात होत असलेल्या पाणी कपातीमुळे नागरिक हैराण

भर उन्हाळ्यात पाण्यावरून वाद
कपातीमुळे गोरेगावमधील रहिवासी संतप्त
गोरेगाव, ता. १६ (बातमीदार) : यंदाच्या उन्हाळ्यात जलदुरुस्तीच्या कामामुळे रहिवाशांच्या हालात भर पडली आहे. त्यांना मोठ्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. गोरेगाव परिसरातील काही विभागांतही पाण्याचा अपुरा पुरवठा होत असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. चाळींतील वस्त्यांमध्ये पाण्यावरून रहिवाशांचे वादही होत आहेत. १५ टक्के कपात असली तरी त्याचा मोठा परिणाम जाणवत असल्याने रहिवाशांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे.
गोरेगाव पूर्व व पश्चिम परिसरातील चाळींमध्ये एका जलवाहिनीवर अनेक घरे विसंबून आहेत. तिथे पाणी भरण्यासाठी गर्दी होत आहे. पाण्यावरून शेजाऱ्यांमध्ये वाद होत आहेत, अशी कैफियत गोरेगाव पूर्व परिसरातील अशोक नगरमधील आशामती सहेजराव यांनी मांडली. भगत सिंग नगरमध्ये पाण्याची मोटार लावण्यावरून महिलांमध्ये बाचाबाचीचा प्रकार घडल्याचे रहिवासी सुनीता मल्लाह यांनी सांगितले.
एसआरएच्या इमारतींमध्ये पाण्याची मोठी समस्या जाणवत आहे. फारच कमी काळाकरिता पाणी सोडण्यात येत असल्याने नागरिकांना ते विकत आणावे लागत आहे. ‘रोज असे पाणी विकत घेणे परवडणारे नाही. आजच्या महागाईच्या काळात पाण्यासाठीच्या वाढीव खर्चाचा भार डोक्यावर आला आहे’, असे रहिवासी महादेव चांदमारे यांनी सांगितले. काही इमारतींमध्ये पाणी येण्याची वेळही नियोजित करण्यात आलेली नाही. पाणी येण्याची आधीची वेळही बदलण्यात आल्याने रहिवाशांची फारच गैरसोय होत आहे. परिणामी ते संताप व्यक्त करत आहेत.

पुरसे पाणी तरी द्या!
मुंबईकरांसाठी रोज ४ हजार २०० दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे; परंतु सध्या सुरू असलेल्या कपातीमुळे ३ हजार ८०० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा होत आहे. त्यात यंदाच उन्हाळा अतितीव्र झाल्यामुळे नागरिकांच्या हालात भर पडली आहे. पुरेसे पाणी तरी मिळू दे, अशी मागणी ते पालिका प्रशासनाकडे करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com