डोंबिवलीकरांनी लुटला पुस्तकांचा खजिना

डोंबिवलीकरांनी लुटला पुस्तकांचा खजिना

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १९ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत महाराष्ट्र नवनिर्माण सेना व पै फ्रेण्ड्स लायब्ररी यांच्या वतीने पुस्तक प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुस्तक प्रदर्शनात सुमारे ८ ते १० हजार पुस्तके मांडण्यात आली असून, पुस्तक खरेदीवर मनसेच्या वतीने २५ टक्के सवलत देण्यात आली आहे. डोंबिवलीकरांनी या प्रदर्शनास भेट देत अवघ्या तीन दिवसांत दोन ते तीन हजार पुस्तकांची खरेदी केली आहे. वाचकांचा प्रतिसाद पाहता प्रदर्शन आणखी दोन दिवस वाढवण्यात आले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना डोंबिवली शहर शाखेच्या वतीने १४ एप्रिलला भारतरत्न डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत पुस्तक प्रदर्शन व विक्री या चार दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मनसे डोंबिवली शहर मध्यवर्ती कार्यालयात भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनास सोमवारी कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी भेट दिली. याप्रसंगी डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज घरत, पै फ्रेण्ड्स लायब्ररीचे संस्थापक पुंडलिक पै यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पुस्तक प्रदर्शनाविषयी माहिती देताना मनोज घरत म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करत असतो, परंतु डॉ. बाबासाहेब हे जे काही शिकले आहेत, जे विचार देऊन गेले आहेत, त्यांनी केलेले लिखाण यातून त्यांनी एक मूलमंत्र दिला आहे. तो म्हणजे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. यासाठी आपल्याला वाचन हे महत्त्वाचे असून त्याच धर्तीवर आमदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुस्तक प्रदर्शन भरवण्यात आले आहे. प्रत्येक पुस्तकावर २५ टक्के सवलत देण्यात आली असून त्यास वाचकांचा प्रतिसाद मिळत आहे.
------------------
वाचनप्रेमींचा प्रतिसाद
पै फ्रेण्ड्स लायब्ररीचे पुंडलिक पै म्हणाले, या प्रदर्शनात ८ ते १० हजार विविध विषयांची पुस्तके मांडण्यात आली आहेत. वाचनाची आवड कमी होत असल्याचे बोलले जाते; मात्र आज येथे मनसेच्या वतीने पुस्तकांच्या खरेदीवर २५ टक्के सवलत देण्यात आली आहे. यास वाचनप्रेमींनी प्रतिसाद दिला आहे. या उपक्रमामुळे पुस्तके लोकांपर्यंत पोहोचून वाचन संस्कृती रुजण्यास मदत होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com