बदलापूर पालिकेसाठी साडेअठ्ठावीस कोटींचा निधी मंजूर

बदलापूर पालिकेसाठी साडेअठ्ठावीस कोटींचा निधी मंजूर

बदलापूर, ता. २० (बातमीदार) : कुळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या इमारतीच्या उर्वरित बांधकामासाठी राज्य सरकारकडून २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे; तर वालिवली येथे प्रस्तावित असणाऱ्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी साडेतीन कोटी रुपये असे एकूण साडेअठ्ठावीस कोटी रुपयांच्या निधीला मान्यता मिळाली आहे. ही रक्कम लवकरच पालिकेकडे वर्ग होणार असून प्रशासकीय इमारतीच्या कामाला गती येणार आहे.

बदलापूर पूर्व भागातील स्टेशन पाडा परिसरात सातमजली प्रशासकीय इमारत उभी राहत असून त्यासाठी एकूण ४५ कोटींचा खर्च प्रस्तावित आहे. यातील ३० कोटी रुपयांचे बांधकाम यापूर्वीच पूर्ण झाले आहे. या रकमेपैकी पाच कोटी रुपये राज्य सरकारने दिले असून उर्वरित रक्कम पालिकेने खर्च केली आहे. उर्वरित बांधकाम आणि अन्य खर्चासाठी आवश्‍यक असलेला २५ कोटींचा निधी राज्य सरकारने द्यावा, यासाठी अनेक महिन्यांपासून मागणी होत होती. यासाठी शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे सरकारकडे पाठपुरावा करत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निधी मंजूर केला असून प्रशासकीय इमारत आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे काम लवकरच पूर्ण होईल, असा विश्‍वास वामन म्हात्रे यांनी व्यक्त केला.

बदलापूर पालिकेची प्रशासकीय इमारत म्हणजे शहराची ओळख आहे. ही इमारत भव्य व्हावी, यासाठी अनेक महिन्यांपासून राज्य सरकारकडून निधी मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न होते. अखेर त्याला यश आले असून, मुख्यमंत्री हे ठाणे जिल्ह्यातले असून, बदलापूरकरांवर त्यांचे विशेष प्रेम आहे. त्यामुळे आता लवकरच या इमारतीचे बांधकाम पूर्ण करून, ती वर्ष अखेरीस बदलापूरकरांच्या सेवेसाठी उभी राहील.
- वामन म्हात्रे,
शहरप्रमुख, बाळासाहेबांची शिवसेना

प्रशासकीय इमारतीसाठी २५ कोटी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रस्तावित स्मारकासाठी ३.५० कोटींचा निधी खर्च करण्यात येणार आहे. भविष्यात बदलापूर महानगरपालिका झाल्यास त्या धर्तीवर या इमारतीची बांधणी केली जात असून लवकरच बांधकाम पूर्ण होईल.
- योगेश गोडसे,
मुख्याधिकारी, कुळगाव बदलापूर नगरपरिषद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com