बेशिस्त टॅक्सी चालकांवर कारवाईचा बडगा

बेशिस्त टॅक्सी चालकांवर कारवाईचा बडगा

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : चर्चगेट रेल्वेस्थानकाबाहेर नियमबाह्य टॅक्सी उभ्या करून गर्दीच्या वेळी वाहतूक कोंडी करणाऱ्या चालकांवर ताडदेव आरटीओ कार्यालयातील भरारी पथकाने कडक कारवाई केली. कारवाईदरम्यान स्थानक परिसरातील टॅक्सीचालकांची कागदपत्रे तपासण्यात आली. जादा प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकांवरही कारवाई करण्यात आली.
चर्चगेट रेल्वेस्थानकाबाहेर मुख्य रस्त्यांवर टॅक्सी उभ्या केल्या जात असल्याने गर्दीच्या वेळी वाहतूक कोंडी होत आहे. स्थानकाबाहेरच बेस्ट बसचा थांबा असून त्या ठिकाणीसुद्धा बेस्ट बसऐवजी टॅक्सींच्या रांगा दिसून येतात. त्यामुळे रेल्वेस्थानकावर जाणाऱ्या-येणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. तिथे वाहतूक नियमांची पायमल्ली होताना दिसून येत असल्याचे वृत्त ‘सकाळ’ने १८ एप्रिल रोजी प्रकाशित केले होते. त्यानंतर वृत्ताची दखल घेऊन ताडदेव आरटीओ कार्यालयातील भरारी पथकांकडून कारवाई करण्यात आली.
रेल्वेस्थानकाच्या २५० ते ३०० मीटर अंतरावर रिक्षा-टॅक्सीची पार्किंग असावी, असा नियम आहे. मात्र, चर्चगेट रेल्वेस्थानकाला लागूनच टॅक्सीचालकांकडून अतिक्रमण करण्यात येते. प्रवाशांना स्थानकाबाहेर निघताच टॅक्सीचालकांच्या गर्दीचा सामना करावा लागतो. सकाळी पिकअवर्समध्ये आणि दुपानंतर परतीच्या वेळी टॅक्सीचालकांकडून चर्चगेट रेल्वेस्थानकापुढे रस्त्यांवरच वाहन थांबवून प्रवाशांची वाहतूक केली जाते. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून नियमित कारवाई किंवा चर्चगेट रेल्वेस्थानक परिसरात वाहतूक पोलिसांचा नियमित बंदोबस्त असण्याची गरज निर्माण झाली आहे.

चर्चगेट रेल्वेस्थानक परिसरात भरारी पथक पाठवून कारवाई करण्यात आली आहे. नियमबाह्य प्रवासी वाहतूक करणाऱ्या १० टॅक्सीचालकांवर कारवाई करण्यात आली असून, इतरांना समज देण्यात आली आहे. स्थानक परिसरात नियमितपणे पथकाचे लक्ष असणार आहे.
- सुधीर जायभये,
सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, ताडदेव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com