दापचरी मध्ये पुन्हा पाणी समस्या

दापचरी मध्ये पुन्हा पाणी समस्या

कासा, ता. २६ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील दापचरी दुग्धप्रकल्पातील दोनशे कुटुंबांना सध्या पाणीसमस्येला तोंड द्यावे लागत आहे. अनेक दिवसांपासून दुग्ध प्रकल्पातील विद्युत जनित्र बंद असल्याने प्रकल्पातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
दापचरी दुग्ध प्रकल्पाच्या परिसरात अजूनही काही शेतकरी आपला व्यवसाय करीत आहेत. यात गाईगुरे पालन, भाजीपाला लागवड करीत आहेत; पण काही दिवसांपासून विजेच्या आणि पाणीसमस्येने येथील नागरिक हैराण झाले आहेत. या दुग्ध प्रकल्पात सध्या दोनशेपेक्षा अधिक कुटुंबे राहत असून जवळ एक मुलांचे वसतिगृहसुद्धा आहे. येथील दुग्ध प्रकल्पाचे कार्यालय पालघर येथे स्थलांतरित करण्यात आल्याने मोठी गैरसोय होत आहे. गेल्या आठ दिवसांपासून येथील वीजसमस्या सुटत नसल्याने पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. डोक्यावर हंडे घेऊन पाणी आणावे लागत आहे. यासाठी प्रशासनाने मार्ग काढावा, अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.
.....
दापचरी दुग्ध प्रकल्पातील वीजसमस्या मोठी आहे. काही महिन्यांपूर्वीदेखील विजेच्या तारा जळाल्यामुळे अनेक दिवस वीज नव्हती; तर सध्या आठ दिवसांपासून जनित्र खराब झाल्याने वीज व पाणीपुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी आम्ही दुग्ध प्रकल्प अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे.
- सुनील शिंदे, सामजिक कार्यकर्ते
.....
गेल्या अनेक वर्षांपासून दुग्ध प्रकल्पातील अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. विजेचे जनित्र खराब होणे, केबल जळणे यामुळे या भागात नेहमी विजेचा खेळखंडोबा सुरू होतो.
- प्रशांत राजगिरे, ग्रामस्थ
.....
सध्या दापचरी दुग्ध प्रकल्पाच्या भागात कर्मचाऱ्यांची कमतरता त्याचबरोबर निधी कमतरता असल्याने अशा समस्या उद्‌भवत आहेत. तेथील अधिकाऱ्यांना सांगून ही समस्या दूर करतो. या सर्व प्रकाराची माहिती घेऊन पुढील कारवाई केली जाईल.
- श्रीकांत शिरपूरकर, दुग्ध प्रकल्प अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com