Summer Holiday
Summer Holidaysakal

Summer Holiday : वीकेंड पर्यटनासाठी वसईमधील किनारे सज्ज

मुलांच्या परीक्षा संपल्यानंतर वेध लागतात ते सुट्टीमध्ये फिरायला जाण्याचे. मग डेस्टिनेशन शोधण्याची सुरुवात

विरार : मुलांच्या परीक्षा संपल्यानंतर वेध लागतात ते सुट्टीमध्ये फिरायला जाण्याचे. मग डेस्टिनेशन शोधण्याची सुरुवात होते. अशात मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या वसईला पर्यटकांची पसंती मिळत आहे. ठाणे, मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली येथून यांना मध्यवर्ती ठिकाण असल्याने वसईत वीकेंडला पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.

मिनी गोवा अशी वसईची ओळख असल्याने येथील समुद्र किनाऱ्यांना पर्यटकांची पहिली पसंती मिळत आहे. वसईला पश्चिम पट्ट्यात लांबच लांब किनारा लाभला आहे. त्याचबरोबर येथील ऐतिहासिक महत्त्व असलेले किल्ले, मंदिरे, चर्च हे पर्यटकांना आकर्षित करत आले आहेत. वसई-विरार पट्ट्यात सुरुची बीच, राजोडी बीच, कळंब बीच, रानगाव बीच, अर्नाळा बीच असे निसर्गरम्य समुद्रकिनारे आहेत.

सूर्यास्ताच्या वेळी आपल्या नातेवाईकांसह घोडेस्वारीसह विविध साहसी खेळ येथे करता येत असल्याने पर्यटक मोठ्या संख्येने वसईत दाखल होत आहेत. वसई हे मुंबईला लागून असलेले तरी येथे अजूनही गावपण टिकून आहे. येथे येणारे पर्यटक मोगरा, चाफा, जाई, जुईच्या वाड्या पाहून हरपून जातात. त्यामुळे वसईला वीकेंड पर्यटनासाठी पहिली पसंती मिळत आहे.
वसई-विरार महापालिकेने येथील पर्यटन वाढावे यासाठी कंबर कसली आहे.

वसई विजयोत्सवाच्या माध्यमातून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या योजना हाती घेतल्या आहेत. त्यामुळे येत्या वीकएण्डला आणि सुट्टीत मुंबईच्या जवळ असलेल्या वसईला भेट देण्यासाठी अनेक पर्यटकांची पावले या ठिकाणी आतापासूनच पडू लागली आहेत.

धार्मिक, ऐतिहासिक ठिकाणेही आकर्षण
वसईत निसर्गरम्य समुद्र किनाऱ्यांसह विविध धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळे आहेत. यात अर्नाळा आणि वसईचा किल्ला, जीवदानी मंदिर, चंडिका मंदिर, निर्मलचे शंकराचार्य समाधी, तुंगारेश्वर अभयारण्य, ईश्वरपुरी येथील सांदीपनी आश्रम अशी एक ना अनेक ठिकाणे पर्यटकांची आकर्षण ठरली आहेत.

खाद्य पदार्थांची रेलचेल
वसईत येणाऱ्या पर्यटकांच्या जिभेचे चोचले पुरवण्यास विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांची रेलचेल आहे. या ठिकाणचे पोहे भुजिंग, सामवेदी अळूवडी, भरलेले बटाटे, वाल वांग्याची भाजी, भंडारी, आगरी पद्धतीचे जेवण, त्याचप्रमाणे किनाऱ्यावर मिळणारी ताजी मासळी याचा आस्वाद पर्यटकांना घेता येतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com