जांभूळ शेतीतून समृद्धीकडे वाटचाल

जांभूळ शेतीतून समृद्धीकडे वाटचाल

मनोर, बातमीदार

पालघर तालुक्यातील बहाडोली गाव जांभळांसाठी प्रसिद्ध आहे. वैतरणा नदी किनारची गाळाची माती आणि दमट वातावरण जांभळांच्या झाडांना पोषक ठरते. जांभळाच्या झाडामागे ३० ते ४० हजारांचे उत्पन्न मिळत असल्याने पारंपरिक भात शेती सोडून शेतकरी जांभूळ लागवडीकडे वळत आहेत. दरम्यान, जांभळांना भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारीही प्रयत्नशील आहेत.

बहाडोली आणि खामलोली गावात जांभळाची सहा हजार झाडे आहेत. नव्याने दोन हजार झाडांची लागवड करण्यात आली. कृषी विभागाच्या मार्गदर्शनात नवीन लागवड आणि जांभळाचे उत्पादन आणि फळाच्या गुणवत्तेत वाढ करण्यासाठी मेहनत घेतली जात आहे. बहाडोलीच्या जांभळांना मुंबई आणि लगतच्या बाजारपेठेत मोठी मागणी असते. डिसेंबर महिन्यात जांभळाच्या झाडाला मोहोर आल्यानंतर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जांभळे काढणीसाठी तयार होतात. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत दीड महिना जांभळांचा हंगाम सुरू राहतो.

फळावर प्रक्रिया उद्योग सुरू करण्याची गरज
शेतकरी पावसाळ्याच्या काळात येणाऱ्या फळांपासून रस निर्मिती आणि बियांपासून पावडर तयार करून विक्री करतात. मे महिन्यात जांभळाना मागणी मोठी असल्याने प्रतिकिलो हजार ते बाराशे रुपयांचा उच्चतम दर मिळू शकतो. एका झाडापासून सरासरी किमान तीनशे, तर कमाल पाचशे किलो जांभळांचे उत्पादन होते.

एक झाडापासून ४० हजारांपर्यंत उत्पन्न
बहाडोली गावाच्या परिसरात उच्च प्रतीच्या जांभळांचे उत्पादन देणारी सुमारे सहा हजार झाडे आहेत. जांभळाच्या एका झाडापासून हंगामात शेतकऱ्याला सुमारे ३० ते ४० हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. मधुमेहावर गुणकारी असल्याने जांभळाचा ज्यूस आणि बियांच्या पावडरला मोठी मागणी असते. उत्पन्न वाढीसाठी जांभळापासून ज्यूस आणि बियांपासून पावडर तयार करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे.

फळाचा हंगाम कमी करण्यासाठी संशोधन
मे महिन्याचा शेवटचा आठवडा ते जून महिन्यात सुरू होणाऱ्या जांभळांचा हंगाम एक महिन्याने कमी करण्यासाठी कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठाकडून संशोधन केले जात आहे. यासाठी वयोमान आणि उंची वाढलेल्या झाडांची छाटणी करण्याचा सल्ला कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना देण्यात आला आहे.

जांभूळ विक्रीतून गावातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारले आहे. कृषी विभागाने आता जांभळाच्या भौगोलिक मानांकनासाठी प्रयत्न करावेत.
- अनिल पाटील, शेतकरी

नवीन लागवड केलेल्या झाडांची उंचीत होणारी वाढ रोखण्यासाठी छाटणी करून झाडाचा विस्तार जमिनीलगत झाल्यास फळे तोडणी सोपी होईल.
- तरुण वैती,
तालुका कृषी अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com