अमली पदार्थाच्या विरोधात विशेष मोहिमेत २०० आरोपी अटकेत

अमली पदार्थाच्या विरोधात विशेष मोहिमेत २०० आरोपी अटकेत

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : अमली पदार्थ तस्करीविरुद्धच्या विशेष मोहिमेत मुंबई पोलिसांनी गेल्या पाच दिवसांत ड्रग्जशी संबंधित १६१ प्रकरणात २०० हून अधिक आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ४ हजार २७६ जणांवर गुन्हे दाखल केले असून ८६६ विनापरवाना तंबाखू आणि अन्य तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्या दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे.

अमली पदार्थविरोधी कक्षाने शनिवारी मुंबईत राबवलेल्या तीन भिन्न कारवायांमध्ये ४० लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. माहीम पश्चिम येथे दोन ठिकाणी व गोरेगाव येथे ही मोहीम राबवण्यात आली. त्यात एकाकडून १९५ ग्रॅम मेफेड्रोन एमडी जप्त करण्यात आले. गोरेगाव येथील संतोषनगर परिसरात संशयावरून दोन व्यक्तींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ७५ ग्रॅम एमडी जप्त केले. त्याची किंमत १५ लाख रुपये आहे. या तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली. दुसऱ्या कारवाईत एएनसीच्या घाटकोपर कक्षाने माहीम पश्चिम येथील कासालुना इमारतीजवळून ६८ ग्रॅम एमडीसह २४ वर्षीय तरुणाला पकडले. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या एमडीची किंमत १४ लाख ६० हजार रुपये आहे. याप्रकरणी घाटकोपर कक्षात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. तिसऱ्या कारवाईत वांद्रे कक्षाने सायन-माहीम जोडरस्ता येथून दोन तरुणांना ५२ ग्रॅम एमडीसह ताब्यात घेतले. त्यांच्याकडे जप्त करण्यात आलेल्या एमडीची किंमत १० लाख ४० हजार रुपये आहे. याप्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

---
कारवाई सुरू राहणार
मागील आठवड्याच्या सुरुवातीला सुरू झालेली मुंबई पोलिसांची अमली पदार्थविरोधी मोहीम येत्या काही दिवसांतही सुरू राहणार असल्याची माहिती पुढे येत आहे. गेल्या २४ तासांत किमान ४८ आरोपींना अटक करण्यात आली असून, मेफेड्रोन, गांजा, चरस, हेरॉईन असे अमली पदार्थ मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com