मोबाईल टॉवरमुळे इमारतींना धोका

मोबाईल टॉवरमुळे इमारतींना धोका

भिवंडी, ता. ३ (बातमीदार) : चार दिवसांपूर्वी तालुक्यातील वळ गावात इमारतीच्या टेरेसवर अनधिकृत खोल्या आणि लावलेल्या मोबाईल टॉवरमुळे इमारत कोसळण्याची दुर्घटना घडली, अशी नोंद घेत पोलिसांनी इमारत मालकावर गुन्हा नोंद केला आहे. त्यामुळे शहरातील इमारतीच्या टेरेसवर लावलेल्या मोबाईल टॉवरचा मुद्दा ऐरणीवर आला आहे; तर शहरातील अनधिकृत मोबाईल टॉवरवर कारवाईची मागणी रहिवाशांतून केली जात आहे.
शहरातील अनेक इमारती या सुरुवातीला जमीनमालक आणि त्यानंतर विकासकांनी बांधल्या आहेत. यातील अनेक इमारतींवर मोबाईल टॉवर बसवण्यात आले आहेत. मोबाईल टॉवर बसविण्यासाठी म्हणून इमारतीचे बांधकाम झालेले नाही. त्यामुळे शहरात इमारतीवर असलेले २७७ मोबाईल टॉवर अनधिकृत आहेत. शहरात अनधिकृत बांधकाम करून इमारती बांधण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे किती अनधिकृत इमारतींवर मोबाईल टॉवर लावले आहेत, याचा तपशील उपलब्ध झाला नाही. मात्र शहरातील सर्व टॉवर अनधिकृत असल्याचे पालिकेच्या नगररचना आणि बांधकाम विभागाने निश्चित केल्याने इमारतीच्या बांधकामाबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत.
महापालिका प्रशासन अनधिकृत बांधकाम होऊ नये म्हणून दक्षता घेत नाही तर अनधिकृत बांधकाम झाल्यानंतर ते निष्कासित करीत नाही; तर त्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नावर पालिका प्रशासनाचे लक्ष असल्याने अशा अनधिकृत मोबाईल टॉवरच्या मालकांकडून दरवर्षी शास्तीची रक्कम वसूल केली जात आहे. रक्कम प्रतिवर्षी ३ कोटी ३३ लाखांच्या घरात आहे. त्यापैकी ६७ मोबाईल टॉवरच्या शास्तीबाबत भिवंडी न्यायालयात खटला सुरू आहे; तर न्यायालयाने ही सेवा अत्यावश्यक (इमर्जन्सी) असल्याने ती सील करू शकत नाही, असे नमूद केल्याने मोबाईल टॉवर मालकांचे चांगलेच फावले आहे. त्यामुळे इमारतीमधील नागरिकांना काही धोका आहे काय, याबाबत पालिकेच्या बांधकाम विभागाकडे काही नोंदी नाहीत. मोबाईल टॉवर ही अत्यावश्यक सेवा आहे. मात्र त्यासाठी इमारतीचे बांधकाम योग्य आहे काय, याची शहानिशा या निमित्ताने होणे गरजेचे झाले आहे.
सध्या २७७ पैकी केवळ १५ जणांनी मोबाईल टॉवर अधिकृत करण्यासाठी कोर्टात दावे दाखल केले आहेत; तर मोबाईल टॉवर असणाऱ्या इमारतींची मनपाच्या बांधकाम विभागाने खातरजमा करून त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करणे काळाची गरज आहे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
-----------------------------
वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर कारवाई
महापालिकेच्या शिक्षण मंडळाची भादवड येथे शाळा असून त्या शाळेच्या इमारतीवर भारतीय दूरसंचारचे मोबाईल टॉवर काही वर्षांपूर्वी लावले होते. या टॉवरमुळे शाळेच्या इमारतीला धोका निर्माण होऊन इमारतीचे काही ठिकाणी प्लास्टर गळून भिंतींना भेगा पडल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवास धोका निर्माण झाल्याची तक्रार शाळेच्या शिक्षकांनी पालिका प्रशासनास कळवून देखील कारवाई झाली नव्हती. ही वस्तुस्थिती वर्तमानपत्रातून फोटोसह जाहीर झाल्यानंतर पालिकेच्या बांधकाम विभागाने कारवाई करीत शाळेच्या इमारतीवरील मोबाईल टॉवर तेथून काढले.
.....
शहरात असलेले २७७ टॉवर सर्व अनधिकृत असून त्यापैकी शास्तीबाबत ६७ मोबाईल टॉवरची कोर्टात केस चालू आहे. मोबाईल टॉवर ही अत्यावश्यक सेवा असल्याने ती सील करू शकत नाही, असा कोर्टाचा आदेश आहे.
- दीपक झिंजाड, उपायुक्त, भिवंडी महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com