अवजड वाहनांमुळे कोंडीत भर

अवजड वाहनांमुळे कोंडीत भर

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ४ : ठाणे येथील मुंब्रा बाह्यवळण रस्ता, खारेगाव, तसेच साकेत ब्रीजचे काम सुरू असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. हे मार्ग बंद झाल्याने अवजड वाहनांनी आपला मोर्चा कल्याण-शीळ रोडमार्गे वळविला आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून कल्याण-शीळ रोडवर अवजड वाहनांची गर्दी वाढली आहे. रात्री ८ नंतर ही वाहने कल्याण फाटा मार्गावरून शीळ रोडने येत असून यामुळे प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. तसेच कल्याण मलंगगड रोडवर मध्यरात्री अवजड वाहनांची वाहतूक होत आहे. तसेच कल्याण, भिवंडी दिशेला ये-जा करणारी वाहने जुन्या निळजे पुलाचा वापर करत आहेत. या पुलावरून हलक्या वाहनांना प्रवेश असताना अवजड वाहनेही जात आहेत.
ठाणे उपनगरातील शहरांना ठाणे, मुंबई, नवी मुंबई येथे ये-जा करण्यासाठी कल्याण-शीळ रोड हा महत्त्वाचा मार्ग आहे. एमआयडीसी परिसरांनादेखील हा महामार्ग जोडला असल्याने या मार्गावरून जड-अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. गेल्या काही वर्षांपासून कल्याण-शीळ रोडचे रुंदीकरण, तसेच काँक्रीटीकरणाचे काम, त्यासोबतच देसाई खाडीवरील पूल यांसारखी अनेक महत्त्वाची कामे या ठिकाणी सुरू आहेत. या कामांमुळे, तसेच वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे या मार्गावर अवजड वाहनांना वाहतूक करण्यास वाहतूक विभागाकडून बंदी घालण्यात आली आहे. अवजड वाहनांना बंदी असतानाही गेल्या महिन्याभरापासून या मार्गावर अवजड वाहनांची वर्दळ वाढली आहे. रात्री ८ नंतर अवजड वाहने कल्याण-शीळ मार्गे गुजरात, भिवंडी, नाशिक दिशेला जात आहेत. तसेच बदलापूर पाईपलाईनमार्गे तळोजा एमआयडीसी, अंबरनाथ, बदलापूर एमआयडीसी मार्गे जात आहेत. अवजड वाहनांची संख्या रात्री वाढत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या या ठिकाणी निर्माण झाली आहे. परिणामी खिडकाळी मंदिर रोड, देसाई गाव, पलावा जंक्शन, काटई नाका, मानपाडा रस्ता, विको नाका, पत्री पूल परिसरात वाहन कोंडी होत आहे.
.....
रात्री आमदारांची अचानक एन्ट्री
कल्याण-शीळ रोडवर अवजड वाहनांची वाहतूक वाढली आहे. नवी मुंबई वाहतूक पोलिस चिरीमिरी घेत या वाहनांना कल्याण-शीळमार्गे बंदी असताना वाहतुकीस मुभा देत असल्याचे ट्विट कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. अवजड वाहनांमुळे या भागात कोंडी होत असल्याकडे वाहतूक विभागाचे लक्ष त्यांनी ट्विटच्या माध्यमातून वेधले होते. त्यानंतर आमदार पाटील यांनी बुधवारी रात्री १ वाजता अचानक कल्याण-शीळ रोडवर एन्ट्री मारली. काटई नाका येथे जात आमदारांनी वाहतूक कोंडीचा आढावा घेतला. अवजड वाहनांना बंदी असतानाही ही वाहने या मार्गावर कशी सोडली जातात, असा सवाल करत त्यांनी या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आमदार येताच वाहतूक पोलिसांनी काटई नाका येथे झालेली कोंडी सोडविली, तसेच या वाहनांच्या मार्गावर लवकरच तोडगा काढला जाईल, असे सांगितले आहे.

जुन्या निळजे पुलावरूनही वाहतूक
कल्याण-शीळ रोडवरील पनवेल दिवा रेल्वे मार्गावरील जुना निळजे हा वाहतुकीसाठी असुरक्षित झाल्याचा अहवाल रेल्वे प्रशासनाने दिला होता. त्यानंतर या पुलाची डागडुजी करत हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी पूल खुला करण्यात आला आहे. सध्याच्या घडीलादेखील या पुलाच्या डागडुजीचे काम सुरू आहे. या पुलावरूनदेखील काही अवजड वाहने वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक होऊ नये यासाठी पुलाच्या एका बाजूला हाईट बॅरिकेट लावण्यात आले होते, ते आता दिसत नाहीत. पुलाच्या काही भागास तडे गेलेले आहेत.
....
मुंब्रा बायपास, खारेगाव ब्रीज याठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहे. यामुळे अवजड वाहने कल्याण-शीळमार्गे येत आहेत. अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.
- मंदार धर्माधिकारी, सहाय्यक पोलिस आयुक्त, वाहतूक विभाग कल्याण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com