‘एशियाटिक’मध्ये उलगडला दोनशे वर्षांपूर्वीचा अनमोल ठेवा

‘एशियाटिक’मध्ये उलगडला दोनशे वर्षांपूर्वीचा अनमोल ठेवा

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ ः १७०० ते १८०० च्या काळात मुंबईची भौगोलिक स्थिती आणि क्षेत्राचा विकास सांगणाऱ्या ब्रिटिशकालीन दुर्मिळ नकाशांचे प्रदर्शन मुंबईतील एशियाटिक वाचनालयाच्या दरबार हॉलमध्ये आजपासून सुरू झाले. ४ जूनपर्यंत सुरू राहणाऱ्या प्रदर्शनात मुंबईतील ताडदेव, गिरगाव चौपाटी, कामाठीपुरा इत्यादी विविध भागांमधील ब्रिटिशकालीन नकाशांचा दुर्मिळ ठेवा मुंबईकरांसाठी खुला करण्यात आला आहे.

द एशियाटिक सोसायटी (मुंबई) आणि रोटरी क्लब ऑफ बॉम्बे यांच्या संयुक्त विद्यमाने वाचनालयात ‘मॅप : सर्व्हे दॅट लेफ्ट बिहाईंड अ लेगसी’ नावाने १७०० ते १८०० च्या काळातील ब्रिटिशांनी भारतात केलेल्या सर्वेक्षणावर आधारित नकाशांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. एशियाटिक सोसायटीकडे १६०० हून अधिक दुर्मिळ नकाशांचा समृद्ध संग्रह आहे. २०१९ पासून ‘रोटरी क्लब ऑफ बॉम्बे’ची अर्बन हेरिटेज कमिटी त्यांपैकी जवळपास शंभर नकाशे जतन करण्यासाठी योगदान देत आहे. सर्व्हे ऑफ इंडियाने देशातील विभिन्न प्रदेशांच्या बारकाईने केलेल्या नोंदींचे अभूतपूर्व दर्शन प्रदर्शनात घडते. ४ जूनपर्यंत सकाळी साडेदहा ते संध्याकाळी साडेसहादरम्यान ते सुरू राहणार आहे.

रविवारी पहिल्याच दिवशी मुंबईकरांचा प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद मिळाला. ‘पास्ट परफेक्ट हेरिटेज मॅनेजमेंट’ संस्था प्रदर्शनात संशोधक आणि स्वयंसेवक म्हणून भूमिका बजावत आहेत. संस्थेच्या सहसंस्थापिका दीप्ती आनंद म्हणाल्या, ‘प्रदर्शनातील नकाशे एक दुर्मिळ ठेवा असून आगामी काळात आम्ही लहान मुले आणि मुंबईकरांसाठी एक छोटा अभ्यास दौरा आयोजित करणार आहोत. त्यातून नकाशातील तेव्हाची आणि आजच्या २१ व्या शतकातील मुंबई असा बदल अनुभवता येईल.’

सर्वेक्षणामध्ये भारतीय उपखंडाचे आतापर्यंतचे काही पहिले गणले जाणारे अचूक नकाशे दाखवण्यात आले आहेत. सुरुवातील गुप्तपणे करण्यात आलेला सर्व्हे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील क्षेत्र समजावून घेण्याचा प्राथमिक पर्याय होता. त्याद्वारे त्यांनी हळूहळू आपल्या क्षेत्रांवर नियंत्रण मिळवले.

महसुली सर्वेक्षणातून जुन्या मुंबईचे दर्शन
- प्रदर्शनात कर्नल जी. ए. लॉफ्टनमार्फत करण्यात आलेल्या दुसऱ्या मुंबई महसुली सर्वेक्षणातील दहा नकाशेही मांडण्यात आले आहेत. १८६८-६९-७० मध्ये झालेल्या सर्वेक्षणातून त्या काळच्या मुंबईचे दर्शन घडते. त्यामध्ये मुंबईचे रेल्वेमार्ग, गिरण्या सुरू होण्याआधीची मुंबई, पाण्याच्या टाक्या आणि इतर सरकारी कार्यालयांच्या नोंदी आहेत.
- गिरगाव चौपाटी, ताडदेव, कामाठीपुरा आणि माझगाव अशा मुंबईतील काही भागांचे नकाशेही प्रदर्शनात आहेत. ते बनवण्यासाठी ‘एशियाटिक’च्या पायऱ्यांवर एक निशाणी बनवण्यात आली होती. समुद्रसपाटीपासूनची उंची असे प्रमाण वापरून नकाशे बनवण्यात आले आहेत. ती निशाणी आजही पायऱ्यांवर आढळत असल्याचे इतिहासतज्ज्ञ सांगतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com