मरीन ड्राईव्ह परिसरात दुभाजकांमध्ये ‘बॅरियर्स’

मरीन ड्राईव्ह परिसरात दुभाजकांमध्ये ‘बॅरियर्स’

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० ः मरीन ड्राईव्ह परिसरात अपघात रोखण्यासाठी पालिकेकडून उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. यामध्ये रस्ता ओलांडणाऱ्‍‌यांना प्रतिबंध करण्यासाठी बॅरियर्स लावण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
मरीन ड्राईव्ह परिसरात येणाऱ्या पर्यटकांना उत्तम दर्जाच्या नागरी सुविधा पुरवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच पाहणी केली होती. त्या वेळी त्यांनी महापालिका प्रशासनाला विविध निर्देश दिले होते. त्‍या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून मरीन ड्राइव्ह परिसरात निरनिराळ्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. मुंबई वाहतूक पोलिसांनी मरीन ड्राईव्ह परिसरातील रस्त्याच्या दुतर्फा ‘हमखास अपघातप्रवण क्षेत्रां’चे सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणामध्ये निर्देशित ठिकाणी पादचाऱ्यांकडून रस्ता ओलांडण्याचे प्रकार रोखता यावेत म्हणून मुंबई वाहतूक पोलिसांनीदेखील पालिका प्रशासनाला विनंती केली आहे. त्‍यानुसार लवकरच येथील दुभाजकांवर बॅरियर्स लावण्यात येणार आहेत.

रस्ता दुभाजकांमध्ये ‘कडे’
कुलाब्यामधील पालिकेच्या ए विभागाच्या हद्दीतील मरीन ड्राईव्ह भागात, रस्त्यांच्या दुभाजकांमध्ये फॅब्रिकेटिंग आणि रेलिंग बॅरियर्स लावण्यासाठीची प्रक्रिया विभाग कार्यालयामार्फत सुरू करण्यात आली आहे. अपघातप्रवण भागात हे बॅरियर्स लावण्यात येणार आहेत, अशी माहिती सहायक आयुक्त शिवदास गुरव यांनी दिली आहे. दुभाजकांमध्ये बॅरियर्सवरून रस्ता ओलांडणे शक्य होणार नाही, इतक्या उंचीचे हे फॅब्रिकेटेड बॅरियर्स लावण्यात येतील. तसेच समुद्राच्या दिशेने पाहताना दृश्यमानता कायम राहील, अशा पद्धतीने त्यांची उंची कमी-जास्त ठेवण्यात येणार आहे.

बॅरियर्स लावण्याची मागणी
मरीन ड्राईव्ह वाहतूक पोलिस आणि चर्चगेट परिसरातील रहिवासी संघटनांनी देखील बॅरियर्स लावण्याची मागणी पालिकेकडे केली होती. बॅरियर्सच्या माध्यमातून अपघात टाळता येणे शक्य आहे. त्यासाठीच संपूर्ण मरीन ड्राईव्ह परिसरात बॅरियर्स लावण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com