सेतू सहकाराचा

सेतू सहकाराचा

सेतू सहकाराचा सदर
शरद्चंद्र देसाई
वकील, सहकार न्यायालय


योग्य कागदपत्रांनुसार संस्थेच्या दप्तरी वारसाची नोंद

प्रश्न ः माझ्या आई-वडिलांच्या नावे सदनिका व तिचे भाग होते. माझ्या वडिलांचे नाव खरेदी खत व भाग दाखल्यामध्ये प्रथम आणि आईचे नाव दुसरे आहे. वडिलांचे या वर्षी मार्चमध्ये इच्छापत्र व नामनिर्देशन करण्यापूर्वीच निधन झाले. संस्थेला मृत्यू दाखला देऊन वडिलांचे नाव सदनिकेच्या भाग दाखल्यातून कमी करून केवळ आईच्या नावे सदनिका व भाग दाखला ठेवावा, ही विनंती केली आहे. मात्र संस्था यावर काहीच निर्णय घेत नाही. याबाबत मार्गदर्शन करावे.
- भूषण चक्रदेव, चुनाभट्टी, मुंबई

उत्तर ः तुमच्या सहकारी संस्थेने आदर्श उपविधी स्वीकारली आहे, असे गृहीत धरून हे मार्गदर्शन करत आहे. सभासदाचा मृत्यू झाल्यास महाराष्ट्र सहकारी अधिनियम १९६० च्या कलम २५ अन्वये त्याचे सभासदत्व संपुष्टात येते. सहकारी संस्था आणि मृत्यू झालेल्या सभासदाचे नाव अधिनियम २५ (अ) अन्वये संस्थेच्या संपूर्ण दप्तरांमधून काढून टाकणे आवश्यक असते. तसेच कलम १५४ (ब) (१३) अन्वये अशी माहिती संस्थेकडे आल्यानंतर ज्या वारसांनी संस्थेकडे रीतसर अर्ज करून मृत सभासदाच्या जागी त्याचे नाव वारस, सभासद म्हणून लावण्याची मागणी केली आहे, त्यांच्या उपलब्ध असलेल्या कागदपत्रांनुसार संस्थेच्या दप्तरी त्यांची सभासद म्हणून नोंद करता येते. वरील सर्व विवेचन कायद्याअंतर्गत आहे व त्याचे पालन त्यांच्या स्तरावर करणे आवश्यक आहे.
आता तुमच्या समस्येकडे पाहता असे दिसते, की सदनिका संयुक्तपणे आई-वडिलांनी धारण केली होती. दोघांचीही नावे सदनिका खरेदी करारामध्ये होती व त्याच क्रमाने ती संस्थेच्या दप्तरी दाखल करण्यात आली. या दोन संयुक्त सभासदांपैकी एकाचा मृत्यू झाला व तशी माहिती संस्थेच्या दप्तरी वारसांनी म्हणजे उर्वरित सभासदाने संस्थेला दिली. त्यामुळे कायदा क्रमांक २५ व २५ (अ) अन्वये संस्थेने कार्यवाही करणे आवश्यक आहे. संस्थेने तुमच्या वडिलांचे नाव संस्थेच्या दप्तरातून घराच्या भाग दाखल्यातून तसेच इतर कागदपत्रांमधून काढून केवळ तुमच्या आईचे नाव त्यावर ठेवणे आवश्यक आहे. आदर्श उपविधी क्रमांक ३५ अन्वये संस्थेने मयत सभासदाची माहिती, कागदपत्रे मिळाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत अशा सभासदाचे संस्थेचा भाग दाखला, मालमत्तेमधील भाग किंवा हितसंबंध यांच्या नियोजित हस्तांतराबाबत हक्क, मागण्या किंवा हरकती मागवण्यासाठी संस्थेच्या सूचना फलकावर एक नोटीस प्रदर्शित करून त्यासंबंधी आवाहन केले पाहिजे. तसेच अशी नोटीस किमान दोन स्थानिक वृत्तपत्रांमध्ये प्रदर्शित करून आलेल्या हरकतीनुसार संस्था कार्यवाही करील, अशी तरतूद आहे. तुमच्या प्रकरणांमध्ये संस्थेकडे संयुक्त सभासद पत्नीच्या रूपाने उपलब्ध व उपस्थित आहे. केवळ मृत सभासदाचे नाव संस्थेच्या पटलावरून तसेच भाग दाखल्यावरून काढून टाकल्यास कार्यवाही पूर्ण होण्यास मदत होईल. संस्था कोणताही निर्णय घेणारच नसेल, तर आपण ही बाब निबंधक कार्यालयाच्या निदर्शनास आणून आवश्यक ती कार्यवाही करू शकता.

सहकारी संस्था, सहकार कायदा याबाबतचे आपले प्रश्न पुढील ई मेल वर पाठवावेत - sharadchandra.desai@yahoo.in

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com