नेचर पार्कने खुलणार डोंबिवली खाडी सौंदर्य

नेचर पार्कने खुलणार डोंबिवली खाडी सौंदर्य

शर्मिला वाळुंज, डोंबिवली
डोंबिवलीतील खाडीकिनारा म्हटले की, अतिक्रमण करून बांधलेल्या चाळी, वाहून आलेला कचरा, त्याला येणारी दुर्गंधी असेच काहीसे चित्र. डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव खाडीकिनाऱ्याचेदेखील असेच रूप पाहायला मिळते. हे रूप मात्र येत्या काही महिन्यांत पालटणार आहे. मोठागाव खाडीलगत सात एकरमध्ये नेचर पार्कची उभारणी करण्यात येत आहे. नैसर्गिक अधिवासात या ठिकाणी तुम्हाला खाडीत विहार करण्यास येणारे परदेशी पक्षी, फुलपाखरे बघता येतील. या नेचर पार्कमुळे घाणेरडा खाडीकिनारा अशी खाडी परिसराची ओळख पुसली जाणार असून भविष्यात डोंबिवलीतील सर्व खाडीकिनारे हे निसर्गाने नटलेले पाहायला मिळतील, अशी आशा डोंबिवलीकर व्यक्त करत आहेत.
कल्याण-डोंबिवली शहराला समुद्र असा खाडीकिनारा लाभला आहे. मात्र या किनाऱ्यावर अतिक्रमण करत भूमाफियांनी चाळी बांधून तो अस्वच्छ असा करून टाकला आहे. चाळीमधील रहिवासी या खाडीकिनारीच कचरा टाकतात, शहरातील काही भागातील कचरा, डेब्रिजदेखील खाडीकिनारी टाकले जाते. त्यासोबतच खाडीतून बाहेर फेकला जाणारा पाण्यातील कचरा, गाळ यामुळे अस्वच्छ, दुर्गंधीयुक्त असा खाडीकिनारा नागरिकांना पाहायला मिळतो. रम्य अशी पहाट, सायंकाळ खाडीकिनारी घालवायची म्हटले, तरी या कचऱ्याने आणि दुर्गंधीमुळे नागरिक फिरकतदेखील नाहीत. कल्याण-डोंबिवली शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करत आहे. कल्याणच्या दुर्गांडी येथील खाडीकिनारी आरमार स्मारक उभारले जात आहे. असे असताना डोंबिवलीतील खाडीकिनाऱ्याचादेखील विकास झाला पाहिजे, या दृष्टीने माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे हे प्रयत्नशील होते. पर्यटन विभागाकडे म्हात्रे यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता. महाराष्ट्र शासन पर्यटन विभागाने या कामासाठी ६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांच्या हस्ते या नेचर पार्कच्या कामाचा शुभारंभ झाला आहे. कामास जोरदार सुरुवात झाली असून येत्या काही महिन्यांतच या खाडीकिनाऱ्याचे रूप पाटललेले डोंबिवलीकरांना दिसेल, असा विश्वास या वेळी दीपेश यांनी व्यक्त केला.
.....
अतिक्रमण रोखण्यासाठी निर्णय
डोंबिवली मोठागाव येथील खाडीकिनारी सात एकर जागेत हे नेचर पार्क उभारले जाणार आहे. या ठिकाणी खाडीलगत बॅक वॉटर तलाव आहे. या तलावात पूर्वीच्या काळी मासे पकडले जायचे, असंख्य परदेशी पक्षी या खाडीकिनारी ठराविक काळात वास्तव्यास येतात; परंतु गेल्या काही वर्षांपासून या बॅक वॉटर तलावात गाळ, कचरा साचून त्याला दुर्गंधी सुटली आहे. तलावात भर टाकून चाळी उभारल्या जात आहेत. हे अतिक्रमण रोखावे, निसर्गाचा अधिवास नागरिकांना घेता यावा. यासाठी येथे नेचर पार्क उभारणीचा प्रस्ताव तयार केला. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्यातून शासनदरबारी पाठपुरावा केला असून या कामास मंजुरी तसेच निधीदेखील उपलब्ध झाला आहे.
...
या असणार सुविधा
नेचर पार्कमध्ये ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी कट्टा, कारंजे, लहान मुलांसाठी गार्डन तसेच जॉगिंग ट्रॅक उभारले जाणार आहेत. खाडी परिसरात नौका विहारची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. काही लहान मोठे ब्रिज येथे असतील. खाडी परिसरातील परदेशातील पक्षी वास्तव्यास येतात. या पक्षांचे निरीक्षण, अभ्यास करण्यासाठी बर्ड वॉचिंग सेंटर उभारले जाणार आहे. येथे पक्षी पाहाता यावे यासाठी मचानची सुविधा असेल. फुलपाखरू उद्यान या ठिकाणी उभारले जाणार आहे, विविध प्रकारची जातीची वृक्षांची लागवड केली जाणार आहे. सर्वसमावेशक असे हे उद्यान असेल, अशी माहिती दीपेश यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com