आंबेडकरी चळवळीचे नेते मनोज संसारे यांचे निधन

आंबेडकरी चळवळीचे नेते मनोज संसारे यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १३ : आंबेडकरी चळवळीतील आक्रमक नेते अशी प्रतिमा असलेले स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष मनोज संसारे (५५) यांचे शुक्रवारी (ता. १२) सायंकाळी प्रदीर्घ आजाराने मुंबई सेंट्रेल येथील बाबू जगजीवनराम रुग्णालयात निधन झाले. गेली दोन वर्षे ते दुर्धर आजाराशी झुंज देत होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. उद्या (ता. १४) सायंकाळी सहा वाजता दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

संसारे यांचे पार्थिव रविवारी (ता. १४) सकाळी १० वाजता वडाळा येथील कोरबा मिठागर येथील शाळेच्या प्रांगणात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. सायंकाळी साडेचार वाजता त्यांची अंत्ययात्रा वडाळा येथून चैत्यभूमीकडे निघेल. सहा वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांच्या फाटाफुटीच्या निषेधार्थ १९९६-९७ च्या काळात रिपब्लिकन जनतेत असंतोष निर्माण झाला होता. त्यावेळी दलित पॅंथरचे नेते भाई संगारे संस्थापक असलेल्या युथ रिपब्लिकन संघटनेचे संघटक म्हणून मनोज संसारे यांनी रिपब्लिकन युवकांचे संघटन बांधले होते.

युथ रिपब्लिकन संघटनेच्या माध्यमातून संसारे यांनी रिपब्लिकन नेत्यांच्या घरावर मोर्चे काढले होते. रिपब्लिकन ऐक्यासाठीही त्यांनी पुढाकार घेतला होता. या ऐक्यासाठी प्रसंगी त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांच्या सभा उधळून लावल्या होत्या. त्यांच्या निधनाने मुंबईतील आंबेडकरी चळवळीत वस्त्यांमध्ये, तसेच राज्यभरातील खेड्यापाड्यांत शोककळा पसरली आहे.

राजकीय कारकीर्द
मनोज संसारे यांनी डिसेंबर २०१२ मध्ये स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाची स्थापना केली. ते सायन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघातून २०१४ मध्ये निवडणूक लढले होते. त्यापूर्वी २००७ मध्ये नायगाव विधानसभा मतदारसंघात झालेली पोटनिवडणूकही ते लढले होते; मात्र त्यांना यश आले नाही. वडाळा कोरबा मिठागर येथून २००२ मध्ये झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत ते स्वबळावर निवडून आले होते. त्यानंतर २०१२ मध्ये झालेली पालिका निवडणूकही त्यांनी जिंकली होती. पालिकेत ते अपक्ष नगरसेवकांचे गटनेते होते. मुंबईतील विविध प्रश्नांवर त्यांनी सभागृहात आवाज उठविला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com