तीन महिन्यांसाठी मच्छीमारी बंदी करावी

तीन महिन्यांसाठी मच्छीमारी बंदी करावी

पालघर, ता. १४ (बातमीदार) : पावसाळ्यातील मासेमारीबंदीचा कालावधी वाढवून ९० दिवस करावा, अशी मागणी पालघर जिल्ह्यातील मच्छीमार संघटना आणि मासेमारी सहकारी संस्थांनी राज्य सरकारकडे केली आहे. महाराष्ट्र सरकारच्या मत्स्यव्यवसाय विभागाने राज्यात १ जून ते ३१ जुलै २०२३ पर्यंत मासेमारीबंदीचा कालावधी जाहीर केला आहे. हा कालावधी वाढवून १५ मे ते १५ ऑगस्ट २०२३ असा तीन महिन्यांचा असावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

मत्स्यव्यवसाय विभागाने ६१ दिवसांचा म्हणजेच १ जून ते ३१ जुलैपर्यंत राज्याच्या सागरी क्षेत्रात यांत्रिक नौकांनी मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या बंदी कालावधीत सागरी कायद्याचा भंग करून मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे मत्स्य व्यवसाय विभागाने सूचित केले आहे. ही बंदी यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी बोटींना लागू राहील; मात्र ही बंदी पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर यंत्रचलित बोटींना लागू राहणार नाही. बंदी कालावधीत मासेमारी करताना यांत्रिक मासेमारी बोटीला अपघात झाल्यास सरकारकडून कोणत्याही प्रकारची भरपाई मिळणार नाही, असे मत्स्य व्यवसाय विभागाने स्पष्ट केले आहे.

मत्स्य दुष्काळसदृश परिस्थितीमुळे मच्छीमार कर्जबाजारी झाला असल्याने उपासमारीची वेळ आली आहे. मच्छीमार समुदाय वाचावा, यासाठी ९० दिवसांचा मासेमारी बंदीचा कालावधी बंधनकारक करावी, अशा मागणीचे पत्र जिल्ह्यातील विविध मच्छीमार संस्थांच्या वतीने राज्य सरकार आणि मत्स्य व्यवसाय विभागाला दिले आहे.

यंदा मत्स्य व्यवसायावर दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने उत्पादनात कमालीची घट झाली आहे. त्यामुळे मच्छीमार संकटात सापडला आहे. उत्पादन घटण्यास विविध कारणे कारणीभूत असली, तरी मासेमारी बंदीचा काळ कमी असल्यामुळे मासेमारीवर परिणाम जाणवत आहे. मासेमारी बंदीचा कालावधी ९० दिवसांचा केल्यास संवर्धन होऊन मत्स्यसाठा वाढेल.
- जयकुमार भाई,
अध्यक्ष, ठाणे जिल्हा मध्यवर्ती मच्छीमार संघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com