टळटळीत उन्हामुळे नालेसफाई मंदावली!

टळटळीत उन्हामुळे नालेसफाई मंदावली!

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ ः सध्याच्या कडाक्याच्या उन्हामुळे सर्वच जण हैराण झाले आहेत. उन्हा-तान्हात काम करणाऱ्या कामगारांना त्याचा मोठा त्रास होत आहे. उन्हाच्या झळा असह्य होत असल्याने कामगार काम सोडून जात आहेत. काही ठिकाणी कंत्राटदाराला काम थांबवावे लागत आहे. यंत्रसामुग्री विभागणीमुळे पुरेशी नालेसफाई होत नसल्याचा फटका बसत आहे. परिणामी नालेसफाई जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लांबण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

निर्धारित वेळेत नालेसफाई करणे बंधनकारक आहे. नालेसफाईच्या कामासाठी सध्या कामगारही मिळेनासे झाले आहे. मिळेल त्या कामगारांकडून काम करून घ्यावे लागत आहे. पूर्व व पश्चिम उपनगरांतून अनुक्रमे ८५ आणि ८६ टक्के नाल्यातील गाळ काढल्याचा दावा पालिका प्रशासन करीत आहेत. नालेसफाई सुरू झाल्यापासून गेल्या दीड महिन्यापासून कंत्राटदार नालेसफाईसाठी कामगार बदलत आहेत. कामासाठी कामगारच मिळत नाहीत. असलेले टिकत नाहीत, अशी परिस्थिती असल्याचे सांगण्यात येत आहे. मजुरीवर माणसे मिळत नाहीत. ती मिळत जातील तशी नालेसफाईची कामे करीत आहेत, असेही सांगण्यात आले.

कामगारांची शोधाशोध
मिठी नदीची ६७ टक्के सफाई झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. मात्र, मिठी नदीचे काम म्हणावे तसे झालेले नाही. त्यासाठीही कामगारांची कमतरता जाणवत आहे. कंत्राटदार कामगारांची शोधाशोध करत आहेत. एक दिवस काम करून दुसऱ्या दिवशी कामगार सुट्टी घेत आहेत. यंत्रसामुग्रीच्या अभावामुळे कंत्राटदार हैराण झाले आहेत. कामगारांची समस्या कायम असल्याने त्यावर मार्ग कसा काढायचा, असा प्रश्न कंत्राटदारांना पडला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com