पदपथांवर जिवाशी खेळ

पदपथांवर जिवाशी खेळ

घणसोली, ता. १५ (बातमीदार)ः कोपरखैरणे परिसरात पदपथांवरच खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी बस्तान बसवले आहे. या विक्रेत्यांकडून कोणत्याही प्रकारची सुरक्षेविनाच गॅस सिलिंडरचा वापर केला जात आहे. त्यामुळे हा निष्काळजीपणा भोवण्याची शक्यता असून पदपथांवर सुरू असलेला हा प्रकार कोणाच्या तरी जीवावर बेतण्याचा धोका बळावला आहे.
कोपरखैरणे विभागात ठिकठिकाणी पदपथांवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. रस्त्याच्याकडेला मोठ्या प्रमाणात या फेरीवाल्यांनी स्वतःचे बेकायदा धंदे सुरू केले आहेत. त्यात विविध प्रकारचे खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्यांचा देखील समावेश आहे. या विक्रेत्यांकडून गर्दीच्या ठिकाणी खाद्यपदार्थ विकण्याचे स्टॉल लावले गेले आहेत. तसेच हातगाड्यांवर हे खाद्यपदार्थ विकत असताना अनेक ठिकाणी घरगुती वापरासाठीचा एलपीजी गॅस सिलिंडरचा वापर केला जात आहे. रात्रीच्या वेळी या खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून मोठ्या संख्येने ग्राहक येत असल्याने अशा वेळेस एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे गॅस सिलिंडरचा असा उघड्यावर वापर होत असताना पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून मात्र कोणतीही कारवाई होत नसल्याने स्थानिकांकडून नाराजीचा सूर उमटत आहे.
------------------------------------------------
सार्वजनिक सुरक्षेच्यादृष्टीने धोकादायक
या विक्रेत्यांनी पदपथांवर पूर्णपणे कब्जा केला आहे. त्यामुळे पादचाऱ्यांवर वर्दळीच्या रस्त्यावरून चालण्याची वेळ आल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. शिवाय उघड्यावरच वापरण्यात येणाऱ्या सिलिंडरमुळे अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गर्दीच्या परिसरात सुरक्षेच्या अनुषंगाने होणारे दुर्लक्ष सार्वजनिक सुरक्षेच्यादृष्टीने देखील धोकादायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे प्रशासनाने याची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
-----------------------------------------------------
कोपरखैरणे विभागात घरगुती सिलिंडरचा खुलेआम वापर होतो. त्यामुळे पादचाऱ्यांसोबत खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी हा प्रकार धोकादायक ठरू शकतो. या प्रकारांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.
- नवीन सरोदय, नागरिक
----------------------------------------------------
कोपरखैरणेमध्ये खाद्यपदार्थ विक्रीसाठी व्यावसायिकांकडून वापरल्या जाणाऱ्या एलपीजी सिलिंडरवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून रोज कारवाई केली जाते. मात्र तरीही त्याचा वापर थांबत नाही.
- देवयानी बोरीकर, अतिक्रमण अधिकारी, महापालिका
------------------------------------------
कोपरखैरणे विभागात गेल्या महिन्यात घरगुती सिलिंडर वापरणाऱ्या व्यावसायिकांवर २८५ केस केल्या होत्या. यासंदर्भात पोलिस प्रशासन महापालिकेला वेळोवेळी कळवत आहे.
- अजय भोसले, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कोपरखैरणे
---------------------------------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com