सांडपाण्यामुळे तलाव झाला नाला

सांडपाण्यामुळे तलाव झाला नाला

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १६ ः ठाकुर्लीतील भोईरवाडी येथील खंबाळपाडा तलावाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. येथील पाण्यात आजूबाजूच्या परिसरातील सांडपाणी मिसळत असल्याने तलावातील पाणी दूषित झाले आहे. त्यातच तलावातील काही मासे मृत पावल्याने त्यांना दुर्गंधी सुटून परिसरातदेखील त्याची दुर्गंधी सुटली आहे. तलावातील पाण्यालादेखील वास मारत असल्याने परिसरातील नागरिकांना आपले दारे-खिडक्या बंद करून बसावे लागत आहे. उन्हामुळे आधीच उकडत असताना या दुर्गंधीने आणखी नागरिक हैराण झाले आहेत. पालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही प्रशासन लक्ष देत नसल्याची तक्रार रहिवासी करतात.
ठाकुर्ली भोईरवाडी परिसरात खंबाळपाडा तलाव आहे. या तलावात गणेशोत्सव तसेच नवरात्रोत्सवात गणेश व देवीचे विसर्जन होते. उन्हाळ्याचे दिवस असल्याने सध्याच्या घडीला तलावातील पाणी आटले आहे. या तलावात आजूबाजूच्या परिसरातील सांडपाणी मिसळत आहे. तसेच काही नागरिक कचरादेखील टाकत आहे. यामुळे तलावातील पाणी दूषित झाले आहे. त्यातच गेल्या आठवड्याभरापासून तलावातील काही मासे हे मृत पावले आहेत. मासे मृत पावून ते तलावाच्या काठाला येऊन कुजल्याने त्यांची दुर्गंधी परिसरात पसरली आहे. मासे कसे मेले, याविषयी काहीही माहिती अद्याप समजलेली नाही.
....
जंतूनाशक फवारणीचे आदेश
दुर्गंधी परिसरात पसरल्याने सामाजिक कार्यकर्ते काळू कोमस्कर यांसह स्थानिक नागरिकांनी पालिकेचे प्रभाग अधिकारी भरत पाटील यांच्याकडे याविषयी तक्रार केली. त्यांनी तात्काळ अधिकाऱ्यांना या ठिकाणी जंतूनाशक फवारणी करण्याचे आदेश दिले. फवारणी करण्यात आल्यानंतर दोन दिवस कमी वास आला; परंतु परत या पाण्याला वास येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
....
तलावातील पाणीउपसा करून तसेच गाळ काढून तलावाची स्वच्छता केली गेली पाहिजे. पाण्याला दुर्गंधी सुटली असून ते हिरवेदेखील झाले आहे. यामुळे परिसरात साथ रोग पसरण्याची शक्यता आहे. भटके कुत्रे तलावातील घाणीतील कचरा, मृत मासे हे बाहेर आणून खात आहेत. या दुर्गंधीमुळे आम्हाला घराची दारे-खिडक्या बंद करून बसावे लागत आहे.
- काळू कोमस्कर, स्थानिक नागरिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com