हिरानंदानीत वीज वाहिनीखाली अनधिकृत बांधकाम

हिरानंदानीत वीज वाहिनीखाली अनधिकृत बांधकाम

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १६ : उच्चदाब वीजवाहिन्यांखाली कोणतेही बांधकाम करण्यास बंदी असतानाही हिरानंदानी इस्टेट परिसरात चक्क हॉटेल, टर्फ थाटून व्यवसाय केला जात आहे. या परिसरात हॉटेल, लहान मुलांच्या क्रिकेट, फुटबॉल खेळासाठी टर्फ बांधण्यात आले असून लहान मुलांची सतत वर्दळ असते. याबाबत पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडे यावर कारवाई करण्याची मागणी मनविसेने केली होती. त्या वेळी ४८ तासांत कारवाई करण्याचे आदेश देऊन १५ दिवसांचा कालावधी उलटूनही कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोपदेखील मनविसेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी केला आहे.
उच्चदाब वाहिन्यांची उंची जमिनीपासून दहा मीटर असते. त्याखाली बांधकामास मनाई आहे. तसेच २२० केव्ही वाहिनीपासून दोन्ही बाजूस १७.५ मीटर व १३२ आणि १०० केव्हीच्या दोन्ही बाजूस नऊ मीटर अंतर सोडून बांधकाम करू शकतात. या उच्चदाब वीजवाहिनीतून मोठ्या प्रमाणात वीज वितरित केली जात असल्याने या वीजवाहिनीच्या खाली एखादी वस्तू असली तरी खेचून घेऊ शकते, त्यामुळे या वीजवाहिनीखाली लोकांचा वावर असणे धोकादायक असतानाही हिरानंदानी इस्टेट परिसरात खुलेआम अनधिकृत बांधकाम करून लोकांचा जीव धोक्यात घातला जात आहे. या परिसरात हॉटेल, खेळाकरिता टर्फ बांधकाम करण्यात आले आहे. या उच्चदाब वाहिनीमुळे जीवितहानीची मोठी दुर्घटना घडू शकते, म्हणून पालिका प्रशासनाला याबाबत कारवाई करण्याची मागणी मनविसेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी एप्रिल महिन्यात केली होती.
...............................
उच्च दाबाच्या विद्युत तारांखाली वाहनेसुद्धा उभी करू नयेत, असे महावितरणचे निर्देश असूनही अनधिकृत टर्फ, हॅाटेल असे बांधकाम करण्यात आले आहे. या ठिकाणी कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून आम्ही तक्रार केली होती; परंतु फक्त नोटीस देण्यात येते मात्र कारवाई होत नाही.
- संदीप पाचंगे, सरचिटणीस, मनविसे.
...
आम्ही डीजेच्या आवाजाबाबत पोलिस आणि पालिका प्रशासनाकडे तक्रार केली होती. रात्री २ ते ३ वाजेपर्यंत आवाजाचा नागरिकांना त्रास होत होता. तसेच उच्च दाबाच्या वाहिनीखाली साधे पक्षीही वावरू शकत नाहीत. इथे तर लहान मुले खेळत आहेत.
- चिंतामणी कारखानीस, सचिव, अविला सोसायटी, ठाणे
....
यासंदर्भात सहायक आयुक्तांना सक्षम प्राधिकारणाकडून तपासणी करून कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तसेच ४८ तासांत कारवाई करण्याबाबतचे कोणतेही आदेश दिले नव्हते.
- जी. जी. गोदापुरे, उपायुक्त, अतिक्रमण विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com