लग्नसराईतच वधु-वराची पायपीट

लग्नसराईतच वधु-वराची पायपीट

खारघर, ता. १८ (बातमीदार) : महिन्याभरापासून लग्नसराई पुन्हा जोमाने सुरू झाली आहे. मात्र, पाच लाख लोकसंख्या असलेल्या खारघर शहरात एकही समाज मंदिर अथवा मंगल कार्यालय नसल्यामुळे वधू-वरांसह पित्याला घरासमोरच मंडप लावून किंवा पनवेल, नवी मुंबई शहरातील मंगल कार्यालयातच लग्र सोहळे उरकण्याची वेळ आली आहे.
शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेऊन खारघर शहराची निर्मिती सिडकोने केली आहे. त्यामुळे गावाचे रूपांतर शहरात झाले असल्याने कौलारू घरांच्या जागांवर आता टोलेजंग इमारती उभारण्यात आल्या आहेत. पण एकीकडे विकास झाला असला तरी दुसरीकडे मात्र शहरीकरणामुळे गावपण कुठेतरी गायब झाले आहे. त्यामुळे गावातील मुख्य रस्ते वगळता इतर रस्त्यांचे गल्ली-बोळात रूपांतर झाले आहे. विशेष म्हणजे, शहर निर्माण करताना सिडकोने शाळा, मैदान, उद्यानाप्रमाणे समाज मंदिराची उभारणे करणे आवश्यक होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाल्याने खारघरसारख्या शहरात एकही समाज मंदिर नसल्यामुळे लग्नसोहळे घरासमोरील मोकळ्या जागांवर करण्याची वेळ आली आहे.
---------------------------------------
समाज मंदिराच्या कामात खोडा
खारघर ग्रामपंचायतीने गावाच्या शेजारील जागेत लग्नकार्य आणि इतर सार्वजनिक कार्यक्रम घेता यावेत, यासाठी समाज मंदिराचे बांधकाम हाती घेतले. समाज मंदिराचे तळमजल्याचे काम सुरू असताना, या जागेवर सिडकोचा हक्क असल्याचे सांगून बांधकाम रोखले. तसेच पालिका अस्तित्वात येताच ग्रामस्थ तथा तत्कालीन लोकप्रतिनिधींनी पालिका आणि सिडकोकडे पाठपुरावा करून समाज मंदिराची जागा पालिकेकडे हस्तांतर करून घेतली. मात्र, आजतागायत पालिकेकडून समाज मंदिराचे काम हाती घेण्यात आले नसल्याने खारघरकरांची गैरसोय होत आहे.
---------------------------------------
मंगल कार्यालयांचे भाडे न परवडणारे
गाव अथवा खारघर वसाहतीत लग्नकार्य असल्यास नवी मुंबईतील मंगल कार्यालये अथवा सिडकोच्या राखीव भूखंडांवर परवानगी घेऊन लग्न सोहळे पार पाडावे लागत आहेत. मात्र, सिडकोच्या भूखंडांचे दर आणि मंगल कार्यालयाचे सध्याचे भाडे परवडणारे नाही. त्यामुळे परिसरातील गावे आणि वसाहतींमधील वधू पित्यांवर घरासमोरच मंडप लावून लग्न-सोहळे उरकून घ्यावे लागत आहे.
----------------------------------------
लोकप्रतिनिधी पाठपुराव्यात अपयशी
पनवेल पालिका अस्तित्वात येऊन सहा वर्षे लोटली. खारघर वसाहतीने गाव आणि शहराचा विकास व्हावा, यासाठी पालिकेत बारा नगरसेवक पाठविले. मात्र, एकही नगरसेवक खारघर वसाहतीत समाज मंदिर व्हावे, यासाठी प्रयत्न करताना दिसून आलेला नाही.
---------------------------------------------------
खारघर गावात समाज मंदिराची जागा हस्तांतर करून घेण्यात यश आले. या जागेवर पालिकेच्या माध्यमातून प्रशस्त समाज मंदिर व्हावे, यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत.
- प्रवीण पाटील, माजी नगरसेवक
-----------------------------------------------
खारघर शहरात दोन खासगी सभागृह आहेत. मात्र, ते खूप लहान आहेत. त्यामुळे लग्न सोहळे असल्यास मंगल कार्यालयासाठी नवी मुंबई गाठावी लागते. मात्र, भरमसाट भाडे सर्वसामान्यांना परवडत नाही.
- प्रसाद परब, खारघर शहर प्रमुख (शिवसेना शिंदे गट )
-------------------------------------------------
पालिका वसाहतीमधील खारघर सर्वात मोठी वसाहत आहे. वसाहतीत तीन ठिकाणी समाज मंदिराच्या भूखंडांसाठी सिडकोकडे पत्रव्यवहार केला आहे. भूखंड प्राप्त होताच समाज मंदिर उभारले जाईल.
- जयराम पाधीर, वसाहत अधिकारी, पनवेल महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com