दृष्‍टीक्षेप

दृष्‍टीक्षेप

आपनालयतर्फे पॅरा लीगल स्वयंसेवक शिबिर
चेंबूर (बातमीदार) ः गोवंडी येथील पॅरा लीगल स्वयंसेवकांना न्यायालयीन, प्रशासकीय व पोलिस स्थानकांतील कामकाजाची माहिती व्हावी, याकरिता आपनालय संस्थेच्या वतीने रफिक नगर कार्यालयात सहा दिवसांचे शिबिर आयोजित केले होते. या शिबिराला स्वयंसेवकांनी उत्‍स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. गोवंडी, शिवाजीनगर परिसरात
स्वयंसेवक आपल्या न्याय्य हक्कांसाठी लढत असतात. या वेळी त्‍यांना न्यायालयीन, प्रशासकीय व पोलिस स्थानकांतील कामकाजाची माहिती व्हावी या करिता आपनालय संस्थेमार्फत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आपनालय संस्थेमार्फत या स्वयंसेवकांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मुंबईच्या मान्यतेने प्रमाणित असलेले पीएलव्ही कार्ड देण्यात आले.

विजयकुमार अंबरगे यांना सन्मानचिन्ह
धारावी (बातमीदार) : सहायक पोलिस निरीक्षक विजयकुमार अंबरगे यांना महाराष्ट्र दिनी जाहीर झालेले पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह नुकतेच मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी प्रदान केले. दरवर्षी पोलिस दलातील उत्तम कामगिरी केलेल्या पोलिसांचा सन्मान केला जातो. त्यात अंबरगे यांची निवड झाली होती. अंबरगे हे १९९१ मध्ये महाराष्ट्र पोलिस दलात सातारा जिल्हा येथे भरती झाले. त्यांनी मुंबईतील धारावी, देवनार, माटुंगा आदी पोलिस स्थानकात आपली छाप पाडली आहे. सध्या ते मुंबईतील डी. बी. मार्ग पोलिस स्थानकात कार्यरत आहेत. विजयकुमार अंबरगे यांना सन्मान चिन्ह प्राप्त झाल्याने धारावीतील रहिवासी आनंद व्यक्त करत आहेत.

कुकडीचे पाणी आत्मचरित्राचे प्रकाशन
वडाळा (बातमीदार) ः ग्रामीण कथा कादंबरीकार द. स. काकडे यांच्या ‘कुकडीचे पाणी’ या आत्मचरित्राचे व दीपलक्ष्मी तांबे लिखित ‘मी आणि माझ्या कविता’ या प्रथम काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा नुकताच प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे कला अकादमी सभागृहात ज्येष्ठ अभिनेते अशोक हांडे यांच्या उपस्थितीत पार पडला. या वेळी ज्येष्ठ व्याख्याते, साहित्यिक व सेवानिवृत्त पोलिस अधिकारी धनंजय वंजारी यांनी काकडे यांची २०० पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झाली असल्‍याचे सांगत त्‍यांच्या आत्मचरित्रातून आत्मदर्शन देणारे पुस्तक निर्माण झाले असल्‍याचे गौरवोद्‌गार काढले. या वेळी स्तंभलेखक संजय नलावडे, माजी नगरसेविका सुनीता शिंदे, कवयित्री दीपलक्ष्मी तांबे आणि पूर्णिमा तांबे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या वेळी व्यासपीठावर साहित्यिक शिवाजी चाळक, भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य वसंतराव जाधव, शब्दरत्न प्रकाशनाच्या प्रकाशिका, द. स. काकडे यांच्या पत्नी शारदा काकडे, कांचन पवार, सतीश काकडे उपस्थित होते.

पर्ल अकॅडमीचे वार्षिक प्रदर्शन
मुंबई ः फॅशन आणि डिझाइन एज्युकेशन पॉवरहाऊस पर्ल अकॅडमीने मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांच्या कार्याचा बहुप्रतीक्षित वार्षिक प्रदर्शन ‘पोर्टफोलिओ’ आयोजित केले होते. या कार्यक्रमाचे उद्‌घाटन प्रख्यात यूएन गुडविल अॅम्बेसेडर अभिनेत्री दिया मिर्झा यांनी पर्ल अकॅडमीच्या अध्यक्षा अदिती श्रीवास्तव, अलका माधन, अँटोनियो मॉरिझिओ ग्रिओली यांच्या उपस्थितीत केले. दिवसाची सुरुवात विद्यार्थी प्रकल्पांच्या प्रदर्शनाने झाली. प्रदर्शनानंतर फॅशन शोने विद्यार्थ्यांना त्यांचे संग्रह प्रदर्शित करण्यासाठी एक मंच दिला आणि त्यांना भविष्यात अपेक्षित उद्योग एक्सपोजरसाठी तयार केले. या कार्यक्रमाने मुंबईतील शेकडो शालेय विद्यार्थ्यांनी आकर्षित केले, जे पर्ल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांच्या सर्जनशील कार्याने थक्क झाले. याव्यतिरिक्त, भारतीय अभिनेते रिधी डोग्रा, सुचित्रा पिल्लई आणि झायेद खान हे विद्यार्थ्यांच्या कामाचे साक्षीदार झाले आणि त्यांनी त्यांचे कौतुक केले.

शीव रेल्‍वे स्थानकातील स्‍वच्छतागृहाची दुरवस्था
धारावी (बातमीदार) : मध्य रेल्वेवरील शीव रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक दोनवरील पुरुष स्‍वच्छतागृहाची दुरवस्था झाली आहे. यामुळे प्रवाशांना त्‍याचा वापर करणे अशक्‍य झाले आहे. तसेच यामुळे येथील फलाटावर दुर्गंधी पसरली आहे. याकडे रेल्वे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी प्रवासी करत आहेत. दरम्‍यान याबाबत स्‍थानक व्यवस्‍थापक अशोक संकपाळ यांनी स्‍वच्छतागृहाची दुरवस्था‍ तातडीने दूर करण्यात येईल, असे आश्‍वासन दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com