कळव्यात धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर !

कळव्यात धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर !

किरण घरत : सकाळ वृत्तसेवा
कळवा, ता. १८ : सध्या ठाणे शहरात अनेक ठिकाणी जुन्या इमारती कोसळण्याच्या घटना घडत आहेत. दोन दिवसांपूर्वी नौपाडा परिसरात जीर्ण इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली होती. घटनेमुळे ठाणे महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्षही खडबडून जागा झाला आहे. पावसाळ्यात कोणतीही अनुचित दुर्घटना घडू नये यासाठी कळवा परिसरात जुन्या इमारतींना कळवा प्रभाग समितीकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
कळवा, खारेगाव आणि विटावा परिसरात १७३ इमारती धोकादायक जाहीर केल्या आहेत. या इमारतींमधील चार इमारती अतिधोकादायक असून यामधील दोन इमारती कळवा प्रभाग समिती प्रशासनाने रिकाम्या केल्या आहेत. त्यामध्ये कळवा बाजारपेठेमधील देवकीनंदन अपार्टमेंट आणि शांताबाई भवन या इमारतींचा समावेश आहे; तर अति धोकादायक इमारतीपैकी कळव्यातील ओमकृष्ण अपार्टमेंट आणि खारेगाव पूर्वमधील क्रिपालबाग सोसायटीमधील रहिवासी जीव धोक्यात घालून येथे राहत आहेत. प्रशासनाने नोटीस बजावूनही ते घर खाली करीत नाहीत. घर खाली केल्यावर योग्य ठिकाणी पुनर्वसन होत नसल्याची भीती असल्याने ते कुटुंब आपली घरे सोडायला तयार नाहीत.

प्रभागात १७३ धोकादायक इमारती
कळवा, खारेगावात अतिधोकादायक पडझड झालेल्या, कोसळण्याच्या स्थितीत असलेल्या (सी १) चार इमारती आहेत; तर बांधकाम होऊन ३५ वर्षे झालेल्या प्लास्टर निखळलेल्या धोकादायक (सी २) इमारतींची संख्या ११ आहे. धोकादायक इमारतींची संख्या १५८ इतकी असून प्रभागात एकूण १७३ इमारती या धोकादायक आणि अतिधोकादायक आहेत.

ओसीविना ८० टक्के इमारती
कळवा, खारेगाव आणि विटावा परिसरातील ८० टक्के इमारतींना महापालिकेने ओसी दिलेल्या नाहीत; पण ठाणे शहर उपनिबंधक कार्यालयात नोंदणी करून त्यांचे सोसायटीमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. जेव्हा अशा इमारती धोकादायक होतात अथवा पडतात तेव्हा त्यात राहणाऱ्या लोकांकडे भोगवटा प्रमाणपत्र नसल्याने त्या ठिकाणी नवीन बांधकाम करताना किंवा महापालिकेकडून पुनर्वसन करताना अनेक जाचक अटींचा सामना करावा लागतो.

दरड क्षेत्रातील नागरिकांनाही नोटीस
ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाने घोलईनगर, आतकोनेश्वर, पौंडपाडा, भास्करनगर, वाघोबा नगर आदी पारसिक डोंगर पायथ्याचा भाग दरड क्षेत्र जाहीर केल्याने तेथे राहणाऱ्या रहिवाशांना कळवा प्रभाग समितीने नोटिसा बजावल्या आहेत.
...
दरवर्षी दरड कोसळून आमच्या झोपड्यांचे नुकसान होते. त्यामुळे येथे पावसाळ्यात राहणे आम्हाला धोक्याचे झाले आहे. महापालिकेने संरक्षक कठडा बांधून आमचे रक्षण करावे.
- रामसुरत प्रजापती, रहिवासी, आतकोनेश्वर, कळवा
...
धोकादायक इमारती व दरड क्षेत्रातील नागरिकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. सध्या सर्वेक्षण सुरू आहे, त्यानुसार ही घरे रिकामी करण्यात येतील.
- सोपान भाईक, अधिकारी, कळवा प्रभाग समिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com