ऐतिहासिक वस्तू, ठेवा संग्रहित होण्याची गरज

ऐतिहासिक वस्तू, ठेवा संग्रहित होण्याची गरज

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १७ : हजारो वर्षांची ऐतिहासिक पार्श्वभूमी, अनेक गडकिल्ले, लेण्या, इतिहासाच्या साक्षीदार असलेल्या भग्नावस्थेतील इमारती असा समृद्ध इतिहास असलेल्या रायगड जिल्ह्यात ऐतिहासिक वस्तुंचे जतनासाठी एकही संग्रहालय नाही. जिल्ह्यात असे संग्रहालय असावे, यासाठी सातत्याने प्रयत्न झाले परंतु ते सत्यात उतरलेले नाही. गडकिल्ल्यांना भेटी देण्यासाठी येणारे पर्यटक, इतिहास अभ्यासक ही खंत सातत्याने व्यक्त करीत आहेत.
अलिबाग येथे माजी पालकमंत्री अदिती तटकरे यांनी राज्य वस्तुसंग्रहालायासाठी जागेचा शोध घेऊन राज्यशासनाला प्रस्ताव पाठवला होता. जिल्ह्यात येणाऱ्या पर्यंटकांसाठी ही पर्वणी ठरली असती, परंतु राज्य वस्तुसंग्रहालायाला मुंबईलगतची जागा असण्याची अट होती, या अटीमुळे हा प्रस्ताव मागे पडला. त्यापूर्वी अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी हिराकोट किल्ल्यात ऐतिहासिक वस्तू संग्रहालय सुरू करण्याची मागणी केली होती. सरखेल कान्होजी आंग्रे यांनी बांधलेला हा किल्ला अद्याप कारागृह म्हणून वापरात आहे. परंतु तो प्रस्तावही मंजूर झाला नाही. किल्ले रायगडच्या संवर्धन आराखड्यात एखाद्या संग्रहालयाचा समावेश असावा, अशीही मागणी जिल्ह्यातील इतिहास अभ्यासकांनी लावून धरली होती, या मागणीकडेही दुर्लक्ष झाले.
सहा वर्षांपूर्वी अलिबागपासून काही अंतरावर असलेल्या नवगाव येथील ‘जेरुसलेम गेट’ येथे ज्यू लोकांच्या लोकसंस्कृतीचे वस्तू संग्रहालय उभारण्यासाठी प्रयत्न झाले. केंद्र सरकारकडे प्रस्तावही गेला, दानशूर व्यक्तींनी मदत देण्याचेही जाहीर केले होते, त्याचेही पुढे काहीही झाले नाही.

ऐतिहासिक संग्रहालयाची गरज
सम्राट अशोक, सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकुल, शिलाहार, बहमनी, गुजरातचे सुलतानांपासून अहमदनगरची निजामशाही, पोर्तुगीज, सिदी, मराठे, मुघल, आंग्रे आणि इंग्रजांनी या भागात सत्ता गाजवली. येथे बौद्ध संस्कृतीची बिजे खोलवर रुजलेली होती, हे येथील बौद्ध लेण्यावरून दिसून येते. चौल-रेवदंडा (चंपावती-रेवती) हे आंतरराष्ट्रीय बंदर होते. येथे जमीन खोदताना अनेक वस्तू, नाणी, मूर्ती सापडलेल्या आहेत. या ऐतिहासिक वस्तूंची माहिती भावी पिढीला व्हावी, यासाठी त्‍यांचा एकाच ठिकाणी संग्रहित करण्याचा प्रयत्‍न अनेकांनी केला, मात्र अद्याप त्‍याला मूर्त रूप आलेल नाही.


समृद्ध ऐतिहासिक ठेवा
जिल्ह्यात ठिकठिकाणी केलेल्‍या उत्खननात अनेक वेळा ऐतिहासिक मूल्य असलेल्या वस्तू सापडतात. ज्यातून कोकणची समृद्धी, सधनतेचे दर्शन घडते. दिवेआगर येथे सापडलेली सुर्वण गणेशमूर्ती, किल्ले रायगडवर सापडलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे सोन्याचे ‘होण’, रेवदंडा येथील उत्खननात सापडलेल्या वस्तू विखुरलेल्या आहेत. त्या एकत्रित मांडण्यात आल्या तर रायगड जिल्ह्याचा समृद्ध इतिहास उजागर होईल.

करमरकर शिल्पालय
अलिबागच्या जवळपास अनेक आकर्षक ठिकाणे आहेत, त्यापैकीच एक म्हणजे सासवण्याचे नानासाहेब करमरकरांचे शिल्पालय. अलिबागकडून रेवसकडे जाणाऱ्या रस्त्यावर १८ किलोमीटरवर सासवणे नावाचे गाव आहे. याच गावात २ ऑक्टोबर १८९१ रोजी सासवणे येथे जन्माला आलेले करमरकर हे शिल्पकलेतील उत्तुंग व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या देवनार येथील स्टुडिओमधील अनेक शिल्पे त्यांच्या मृत्यूनंतर (१३ जून १९६७) सासवण्याच्या एकमजली बंगल्यामध्ये हलविण्यात आली होती. पुढे २ ऑक्टोबर १९८६ रोजी त्यांच्या शिल्पांचे अधिकृत शिल्पालयात रूपांतर करण्यात आले आहे. आज हे शिल्पालय सर्वांसाठी खुले आहे. येथे अनेक व्यक्तींचे पुतळे पहावयास मिळतात.


कोलाडमधील घोणे शिल्पालय
मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाड नाका येथे घोणे यांचे काष्ठशिल्प संग्रहालय आहे. या कलेसाठी आयुष्य वेचणारे काष्ठ शिल्पकार रमेश घोणे याचे हे संग्रहालय. कुठल्याही टाकाऊ लाकडापासून, त्या लाकडाचे मूळ सौंदर्य अबाधित राखून ते त्याला वैशिष्ट्यपूर्ण आकार देतात. चिमणी-गरुड यासारखे पक्षी, माकड, विविध भांडी, खेळणी ,आसन एवढेच नव्हे तर वेगवेगळे मानवी चेहरे, मुखवटे, लाकडाची
पणती स्टँड, लाकडी पक्षी, लाकडी कंदील, लाकडी फोन सोबत लाकडी खुर्ची, टीव्ही युनिट, डायनिंग टेबल अशा सर्व लाकडाच्या वस्तू पाहिल्यावर प्रत्येकाला नवल वाटतो. जवळपास दोन हजार काष्ठशिल्पांचा कल्पक खजिना इथे आपल्याला पाहायला मिळतो. कोकणातील वनसंपदेला त्यांनी दिलेले हे कलात्मक स्वरूप आहे.


अलिबाग येथे पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात, पर्यटनाबरोबरच त्यांना येथील ऐतिहासिक महत्त्व समजावे यासाठी राज्य वस्तु संग्रहालय अलिबाग येथे सुरु करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. या संग्रहालयात राज्यातील ऐतिहासिक वस्तू संग्रहीत स्वरूपात पुढील पिढीला पाहता येणार होत्या. परंतु हा प्रस्ताव नंतर रद्द करण्यात आला.
- अदिती तटकरे, माजी पालकमंत्री-रायगड

रायगड जिल्ह्याला खूप मोठा ऐतिहासिक वारसा आहे. पुढील पिढीला हा ठेवा पहाता यावा यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. अशा ऐतिहासिक वस्तुचे संग्रहालय रायगड जिल्ह्यात एकही नाही. ऐतिहासिक संग्रहालयात ठेवण्यात येणाऱ्या वस्तुंचे ऐतिहासिक मूल्य पैशात मोजता न येण्यासारखे असते, त्यामुळे कडक सुरक्षा व्यवस्था हा एक महत्त्वाचा भाग आहे. त्याचबरोबर असे संग्रहालय सुरु करताना अनेक खात्याच्या परवानग्या घ्याव्या लागतात.
- बी.जी. ऐलिकर, संवर्धन सहायक, पुरातत्त्व विभाग-रायगड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com