वैद्य तरण तलावातील सुरक्षा ऐरणीवर

वैद्य तरण तलावातील सुरक्षा ऐरणीवर

जीवन तांबे ः सकाळ वृत्तसेवा
चेंबूर, ता. १७ ः पालिका एम पश्चिम विभागातील जनरल अरुणकुमार वैद्य तरण तलावात सुविधांचा अभाव असल्याने या तरण तलावात पोहण्यास येणाऱ्या जलक्रीडाप्रेमी व सभासद यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
चेंबूर, गोवंडी, टिळकनगर, विद्याविहार, कुर्ला, घाटकोपर, मानखुर्द, नेहरू नगर व चुनाभट्टी परिसरातील जलक्रीडाप्रेमी व नागरिकांना पोहण्याचा आनंद मिळावा म्हणून पालिका प्रशासनाने चेंबूर एम पश्चिम कार्यालयाशेजारी १९९२ मध्ये जनरल अरुणकुमार वैद्य तरण तलाव सुरू केला. या तरण तलावाचे निकृष्ट काम असल्याने पालिकेने २००७ मध्ये हा तलाव पोहण्यास बंद करून २०१५ मध्ये नव्याने काम सुरू केले. हे काम पूर्ण होण्यास सव्वा तीन वर्षे लागले. मात्र पुन्हा वर्षाभरात या तलावाच्या लाद्या उखडल्यामुळे ठेकेदाराने तलावाचे निकृष्ट काम केल्‍याचे दिसून आले. याबाबत कित्येक संस्था व कार्यकर्ते यांनी आवाज उठविला होता. आता पुन्हा या तलावातील सुविधांचा व सभासदांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

सुविधांची वानवा
ऑलिम्पिकच्या धर्तीवर तलाव बनवण्यात आला असला, तरी सध्या या तलावात सुविधांची वानवा आहे. योग्य तज्‍ज्ञ डॉक्टर, प्रशिक्षक, रुग्णवाहिनी, प्रथमोपचार, योग्य पाणी, दरवाजे, शॉवर, कपडे बदली करण्यासाठी खोली अशा सुविधांची वानवा असल्‍याचे येथील सभासदांचे म्‍हणणे आहे.

तक्रारींकडे दुर्लक्ष
सभासदांनी येथील समस्‍यांबाबत अनेकदा पालिकेकडे तक्रारी केल्‍या आहेत; मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्‍याचा आरोप सभासदांकडून करण्यात येत आहे.

वेळीच उपचार न मिळाल्‍याने दोघांचा मृत्‍यू
तरण तलवात सभासदांना वेळेवर योग्य उपचार मिळत नसल्याची तक्रार वारंवार करण्यात आली होती; मात्र त्‍याकडे दुर्लक्ष केल्‍याने ४ मे रोजी ट्रॉम्बे गावात राहणाऱ्या रेणुका कोळी व १६ मे रोजी घाटकोपर कोपर येथील चिराग नगरमध्ये राहणारे ८० वर्षीय वृद्ध भरत राज यांचा उपचारांअभावी मृत्‍यू झाल्‍याचे येथील सभासदांचे म्‍हणणे आहे.

रुग्णवाहिका ठेवण्यात यावी, याकरिता प्रयत्‍न करीत आहोत. येथील प्रशिक्षक प्रथमोपचार देतात. समोर पाटील हॉस्पिटल आहे. काही समस्‍या उद्‌भवल्‍यास तेथे उपचाराकरिता पाठवले जाते. काही घटना त्वरित घडतात. अजून काही सुविधा देता येतील, याकरिता उपायुक्त यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत. लवकरच येथील प्रश्न मार्गी लावण्यात येतील.
- अर्चना देशमुख, व्यवस्थापक, तरण तलाव

सुविधांचा अभाव आहे. एक बॅच पाऊण तासाची आहे. त्‍यात १० मिनिटे रांग लावण्यात जातात. पोहण्यास केवळ अर्धा तास मिळतो. पालिका नियम लावते. मात्र स्‍वतःसाठी नियम नाहीत. सभासदांसाठी डॉक्टर व रुग्णवाहिका ठेवणे गरजेचे आहे.
- विशाल गायकवाड, सभासद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com