अकरावी ऑनलाईन प्रवेशाचे वेळापत्रक अखेर जाहीर

अकरावी ऑनलाईन प्रवेशाचे वेळापत्रक अखेर जाहीर

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, औरंगाबाद (संभाजीनगर) आणि नागपूर अशा सहा महापालिका क्षेत्रांमध्ये असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांतील २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाचे वेळापत्रक आज शिक्षण संचालनालयाने जाहीर केले. या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना २० मेपासून अर्ज भरण्यासाठीचा सराव अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या संकेतस्थळावर करता येईल. २५ मेपासून विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या भागासाठी नोंदणी सुरू करता येईल.

शिक्षण संचालनालयाने दोन वर्षांपासून वगळण्यात आलेल्या औरंगाबाद महापालिका क्षेत्राचा पुन्हा एकदा ऑनलाईन प्रवेशासाठी समावेश केला आहे. दुसरीकडे प्रवेश प्रक्रिया ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे यंदा ती वेळेत पूर्ण होऊन अकरावीचे वर्गही लवकर सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेकरिता यंदाही व्यवस्थापन, इन हाऊस, अल्पसंख्याक इत्यादीसाठीच्या कोट्यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात प्रचलित धोरणानुसार अल्पसंख्याक कोटा ५० टक्के, इन हाऊस १० टक्के आणि व्यवस्थापन कोटा ५ टक्के ठेवण्यात आला आहे. मात्र यंदा कोणत्या स्थितीमध्ये प्रथम प्राधान्य फेरी (एफसीएफएस) घेतली जाणार नसल्याचेही जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या निकालानंतर अकरावीसाठी पहिल्या काही फेऱ्यांमध्ये आपले प्रवेश निश्चित करणे भाग पडणार आहे.

आज जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार अकरावी प्रवेशाच्या मुख्य तीन प्रवेश फेऱ्या होतील. त्यानंतर विशेष दोन फेऱ्या घेतल्या जातील. गरज निर्माण झाल्यास दैनंदिन फेऱ्यांचेही आयोजन केले जाईल. अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीनंतरच संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होईल, अशी माहिती शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांनी दिली.
---

असे आहे वेळापत्रक
- गुरुवार (ता. १७) पासून विद्यार्थी-पालकांसाठी जनजागृती व माहिती प्रसारित करणे. कनिष्ठ महाविद्यालयातील संबंधितांना प्रशिक्षण
- २० ते २४ मेदरम्यान विद्यार्थ्यांना सर्वांसाठी डमी अर्ज भरता येईल
- अकरावी ऑनलाईन नोंदणीचा भाग एक २५ मे रोजी सकाळी दहा वाजल्यापासून भरता येईल
- २६ मेपासून भाग एकमधील माहिती तपासून घेणे
- दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावीच्या ऑनलाईन पोर्टलवर महाविद्यालय पसंतीक्रम व भाग दोन भरता येईल
- दोन वर्षांनंतर औरंगाबादचा ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत पुन्हा समावेश
- ऑगस्टपर्यंतच प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com