उन्हाळ्यातील फळांचा, घ्या आस्वाद

उन्हाळ्यातील फळांचा, घ्या आस्वाद

नेरूळ, बातमीदार

उन्हाळा म्हटला की, अंगाची लाहीलाही होत असते. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने येणाऱ्या थकव्यामुळे अनेक वेळा उन्हाळा नकोसा वाटतो. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये विविध प्रकारच्या फळांचे सेवन करणे, हे आरोग्याच्या दृष्टीने फारच हितकारक असते. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये शीतपेयांऐवजी शरीरासाठी फळे खाणे अधिक महत्त्वाचे मानले जाते.
उन्हाळ्याचा कालावधी वाढल्याने तापमानही वाढत असल्याचे सध्या चित्र आहे. वाढत्या उन्हामुळे घसा कोरडा पडून सारखी तहान लागते. त्यामुळे अनेकदा विविध प्रकारची शीतपेये पिण्याकडे अनेकांचा कल असतो, पण या शीतपेयांमध्ये भरपूर प्रमाणात रासायनिक साखर वापरली जात असल्याने पचन क्रियेला त्यामुळे बाधा निर्माण होते. त्यामुळे शीतपेये पिण्याऐवजी विविध प्रकारच्या फळांचे सेवन शरीरासाठी अधिक उपयुक्त असल्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञांकडून दिला जातो.
--------------------------------------
स्टारफ्रूट ः ‘अमरख-कमरख’ असं हिंदीमध्ये म्हणवल्या जाणाऱ्या या फळाला ‘स्टारफ्रूट’ या नावाने देखील ओळखले जाते. नावाप्रमाणेच या फळाचा आकारही स्टार सारखाच असतो. स्टारफ्रूट सायट्रिक अॅसिडने भरलेले असते. त्यामुळे या फळाच्या माध्यमातून शरीराला व्हिटॅमिन ‘क’ ची पूर्तता होते. बाहेरून हिरवट-पिवळट रंगाचे दिसणारे हे फळ मेणाचे आवरण असल्यासारखे वाटते. दक्षिण आशियातील हे फळ भारतात वर्षभर उपलब्ध असते. स्टारफ्रूटचा उपयोग सलाड, स्ट्रिट फूड आणि फ्रूट चाटमध्ये केला जातो.
सध्या बाजारात १२० रुपये किलोने स्टारफ्रूट मिळत आहे.
---------------------------------------------------
लिची ः यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण चांगले असते. जे हृदय निरोगी ठेवते. लिची खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. यामध्ये व्हिटॅमिन ‘सी’ चांगल्या प्रमाणात आढळते. गर्भवती महिलांसाठी लिची हे एक चांगले फळ आहे, ज्यामुळे त्यांच्या शरीराला पुरेसे लोह मिळते. ज्यांच्याकडे कमीत कमी कॅलरीज आणि चरबीचे प्रमाण कमी असते. अभ्यासानुसार लिचीमधील आहारातील फायबर वजन कमी करण्यास मदत करू शकते. याव्यतिरिक्त लिची खाल्ल्याने आतड्यांसंबंधी हालचाली नियंत्रित होतात. लिचीच्या एका पेटीसाठी २ हजार ५०० रुपये मोजावे लागतात.
------------------------------------------------
किवी ः अनोख्या चवीसाठी ओळखले जाणारे किवी फळाचे आरोग्यदायी फायदे आहेत. इतर फळांच्या चवीपेक्षा किवी पूर्णपणे वेगळे असते. या फळामध्ये व्हिटॅमिन सी, के, ई, फोलेट आणि पोटॅशियम असते. याशिवाय फळामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात. तसेच किवीच्या फळामध्ये आढळणाऱ्या काळ्या बिया आणि त्याची तपकिरी रंगाची साल खाण्यायोग्य आहे. चीन, न्यूझीलंड, इराण, भारत यासह विविध देशांमध्ये किवीचे उत्पादन केले जाते. बाजारात ४ किवी ८० रुपयांना उपलब्ध आहेत.
---------------------------------------------------
ताडगोळे ः ताडगोळे चवदार आणि शरीरासाठी अत्यंत गुणकारी असे समजले जातात. निसर्गताच थंड असलेल्या या ताडगोळ्यांमुळे शरीरातील उष्णता नियंत्रित राहण्यास मदत होते. तसेच ताडगोळ्यांच्या सेवनामुळे खनिज, लोह, पोटॅशिअम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन ए, बी, सी ही जीवनसत्त्वे मिळतात. त्यामुळे हे फळ शरीरासाठी फारच उपयुक्त आहे. सध्या पालघरमधून मोठ्या प्रमाणावर ताडगोळ्यांची आयात होत असून बाजारात १०० रुपयांना ८ किंवा ९ ताडगोळे मिळत आहेत.
-------------------------------------------
जांभूळ ः अनेक गुणांनी परिपूर्ण असणारे हे फळ आहे. याचा वापर शरीराला बाहेरून आणि अंतर्गत दोन्ही प्रकारे शुद्ध करण्यासाठी केला जाऊ शकतो. जांभळाची साल हे रक्त शुद्ध करणारी आहे. तुमचे रक्त आतून स्वच्छ करते आणि तुमच्या त्वचेची बाहेरून काळजी घेते. तुमचे रक्त शुद्ध असेल तर चयापचय चांगले राहते. जांभूळ हे फक्त फळच नाही तर त्याच्या झाडाची साल, पाने आणि बियाही खूप फायदेशीर आहेत. मोठ्यांसोबत लहान मुलांच्या आरोग्यासाठी जांभूळ फायदेशीर आहे.
--------------------------------------------------
आवळा ः वजन कमी करणे असो किंवा केसांच्या वाढीसाठी आवळ्याचा खूप फायदा होतो. आवळ्यामध्ये असणारे व्हिटॅमिन-सी, फायबर, मिनरल्स या गोष्टींचा फायदा आपल्या शरीराला होतो. आवळ्यामध्ये संत्र, लिंबू या फळांपेक्षा १० पटींने जास्त व्हिटॅमिन ‘सी’ असते. आवळ्याच्या या गुणधर्मांमुळे शरीरातील पेशींच्या पुनरुत्पादनास मदत होते. ज्यांना पित्ताचा त्रास आहे, त्यांनी ‘मोरावळा’ खाल्ल्यास फायदेशीर ठरते. भारतातील आवळ्याचे सर्वात मोठा उत्पादक उत्तर प्रदेश आहे.
----------------------------------------------------
फणस ः फणसातील अँटीऑक्सिडंट्समुळे कॅन्सर, हृदयविकार, मधुमेह आणि डोळ्यांच्या समस्या होण्यापासून रक्षण होते. फणस खाल्ल्याने पोट साफ होते, हिमोग्लोबिन वाढते, रक्तदाब नियंत्रित राहतो. फणसात असणाऱ्या फायबर्समुळे पोट साफ होण्यास मदत होते. अल्सरचा त्रास फणस खाल्ल्याने कमी होतो. सफरचंद, जर्दाळू, केळीपेक्षा काही जीवनसत्त्वे फणसात जास्त असतात. बाजारात फणसाची आयात कोकण, राजापूर तसेच कर्नाटकमधून होत असून घाऊक बाजारात ४० ते १०० रुपयांना गरे मिळत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com