ठाण्यात जैवविविधतेला नवसंजीवनी

ठाण्यात जैवविविधतेला नवसंजीवनी

२२ मे जैवविविधता दिन विशेष
हेमलता वाडकर, ठाणे
कोणे एकेकाळी ‘गुण्यागोविंदाने नांदत’ असलेली जैवविविधतेची साखळी नागरीकरण आणि सिमेंट काँक्रीटच्या जंगलात लोप पावत चालली आहे. अशा अवस्थेमध्ये इतिहासजमा होऊ पाहणाऱ्‍या जैवविविधतेला नवसंजीवनी देत भविष्यातही ही साखळी घट्ट करण्यासाठी आता ठाणे महापालिकेने पुढाकार घेतला आहे. म्हणूनच मियावाकी जंगल, तलाव सुशोभीकरण असो वा खाडीसंवर्धनसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमध्ये आता पर्यावरणतज्ज्ञांची मदत घेण्यात येत आहे.
ठाणे जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. ठाणे शहरही याला अपवाद नाही. अगदी शंभर- दीडशे वर्षांपूर्वी ठाणे शहर हे घनदाट जंगलाने वेढलेले होते. मोठ्या आकाराचे बावबाव वृक्षसह वड, पिंपळ, रायवळ आंबे, फणस, जांभूळ अशी असंख्य देशी झाडांची संपदा होती. त्यामुळे ३४ प्रकारच्या विविध पक्ष्यांचा किलबिलाटाने ठाणे गजबजून जायचे. येऊरच्या जंगलात पांढऱ्‍या पट्ट्याचा वाघही होता. कोल्ह्यांसह ससे, काळवीटचा वावर होता; तर दुसरीकडे ६५ हून अधिक तलावांमध्ये मासेमारी व्हायची. तसेच शहराला लाभलेल्या विस्तीर्ण खाडीचा उपयोगही मोठ्या प्रमाणात मासेमारीसाठी व्हायचा. त्यामुळे ठाणे हे एकेकाळी जैवविविधतेने नटलेले होते, अशी माहिती ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक आणि तज्ज्ञ डॉ. नागेश टेकाळे यांनी दिली.
काळाच्या ओघामध्ये हे चित्र आता पूर्णपणे पालटले आहे. म्हणायला ठाणे हे आजही तलावांचे शहर म्हणून ओळखले जात आहे; पण त्यामध्ये आता ‘जीव’च उरलेला नाही. विस्तीर्ण खाडीकिनारा आहे; पण प्रदूषणाने तिचा गळा घोटला आहे. हिरव्यागार झाडांचे छत्र असले, तरी ती विदेशी असल्याने त्यामध्ये प्रजननक्षमता नसल्याचा दावा पर्यावरणतज्ज्ञांनी केला आहे. कोणत्याही ठिकाणची जैवविविधता ही त्या ठिकाणी असलेले पाण्याचे स्रोत आणि वृक्ष- जंगलांवर अवलंबून असते, अशी माहिती टेकाळे आणि पर्यावरण अभ्यासक रोहित जोशी यांनी दिली. यासाठी त्यांनी काही उपाय सुचवले आहेत; तर दुसरीकडे ठाण्याचा कायापालट करण्याचा संकल्प केलेले पालिका आयुक्त अभिजित बांगर हेही याविषयी तितकेच सतर्क आहेत. म्हणूनच पर्यावरणतज्ज्ञ आणि अभ्यासकांचे मार्गदर्शन घेऊन त्यांनी काही प्रकल्प हाती घेतले आहेत.
....
पुन्हा स्वदेशीकडे वाटचाल
सध्या ठाणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षसंपदा पाहायला मिळते; पण अनेक वर्षांपूर्वी लावलेली ही झाडे विदेशी आहेत. त्यामुळे सावली मिळते, हिरवाई दिसते; पण ही झाडे स्वकेंद्री असल्यामुळे त्याशेजारी कोणतेच इतर स्वदेशी झाड वाढत नाही. तसेच या झाडांवर पक्षी घरटी बांधत नाहीत. एकूणच प्रजननक्षमतेला प्रोत्साहन मिळत नसल्याने ठाण्यात गेल्या काही वर्षांमध्ये पक्षांची संख्या कमी झालेली आढळते. ही परिस्थिती बदलायची असेल, तर जास्तीत जास्त मुळ देशी झाडांची लागवड झाली पाहिजे, असे डॉ. नागेश टेकाळे यांनी सांगितले.

मियावाकी प्रभावी माध्यम
जैवविविधतेची साखळी टिकवून ठेवायची असेल, तर वृक्षसंपदा वाढवण्यावर भर दिलाच पाहिजे. म्हणूनच मियावाकीसारखे प्रकल्प ठाण्यात सुरू झाले आहेत. पूर्वी जी विदेशी झाडे लावली त्याला आपण काही करू शकत नाही; पण आता यापुढे मूळ स्थानिक झाडांनाच प्राधान्य दिले जात आहे. माझी वसुंधरा आणि मियावाकीच्या माध्यमातून ग्रीन यात्रा संस्थेच्या मदतीने हे काम हाती घेण्यात आले आहे. मोघरपाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. आता उन्हाळ्यानंतर चार महिने ब्रेक घेऊन ऑक्टोबरनंतर संपूर्ण शहरभरात दोन लाखांपेक्षा जास्त झाडे लावणे अपेक्षित आहे. त्यामुळे ठाण्यात पुन्हा पक्षांचा किलबिलाट ऐकू येईल, असा दावा पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी केला.

तलावांना मूळ रूप प्राप्त होणे आवश्यक
७०च्या दशकापर्यंत ठाण्यातील तलावांची स्थिती चांगली होती; पण सध्या सुशोभित केलेल्या तलावांमध्येही जीवसृष्टी अस्तित्वात नसल्याचे डॉ. नागेश टेकाळे यांनी सांगितले. ते आता केवळ पाण्याचे डबके ठरत असल्याची टीकाही त्यांनी केली. मुळात तलावांमध्येही समुद्रासारख्या लहरी निर्माण होतात. म्हणूनच त्यांची रचना बशीसारखी आणि गोलाकार असणे आवश्यक आहे. तसेच आजूबाजूला भरपूर स्वदेशी झाडे असणे आवश्यक आहे. पर्यावरणप्रेमी रोहित जोशी यांनीही याला दुजोरा देत ठाणे पालिकेने हाती घेतलेल्या तलाव सुशोभीकरणावर बोट ठेवले. पालिकेने अमृत सरोवरच्या माध्यमातून १५ तलावांच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेतले आहे. त्यापैकी रायलादेवी तलावामध्ये काही दिवसांपूर्वी कासव मृतावस्थेत सापडले होते. अशी घटना पुन्हा होऊ नये यासाठी पर्यावरण अभ्यासक आणि प्रेमींचा सल्ला यापुढील अशा सर्व प्रकल्पांना घेण्याची अट घालण्यात आली असल्याचे रोहित जोशी यांनी सांगितले.
...
दक्षता घेतली जात आहे
अमृत सरोवरच्या माध्यमातून तलावांचे संवर्धन आणि सुशोभीकरण करण्यात येत आहे; पण हे काम करताना पर्यावरणपूरक मैत्रीशील कार्यक्रम हाती घेतला आहे. म्हणजे जैवविविधता टिकवून ठेवणारी पाण्याची गुणवत्ता राहील. तसेच सिमेंट काँक्रीटचे कठडे न बांधता गॅवियन वॉल बांधणार आहोत. तलावाचा रोजचा कचरा काढण्यासाठी बोट ठेवणार आहोत, अशी माहिती प्रदूषण विभागाच्या प्रमुख मनीषा प्रधान यांनी दिली. तसेच सुशोभीकरण केलेल्या तलावांमध्ये तज्ज्ञांच्या सल्ल्याने माशांचे प्रजनन करण्यावरही भर देण्यात असल्याचे सांगितले. त्यामुळे सध्या तलावांमधून नामशेष झालेले मासे, खेकडे, कासव पुन्हा दिसून येतील. तसेच परदेशी पक्षांचा वावरही पुन्हा दिसून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सांडपाण्याचे नियोजन
तलाव आणि खाडीमध्ये मोठ्या प्रमाणात सध्या सांडपाणी सोडले जात आहे. म्हणूनच सांडपाणी प्रक्रियेवर ठाणे महापालिका भर देत असल्याची माहिती आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली. शहरात दररोज ३५० दशलक्ष लिटर सांडपाणी तयार होते. हे सांडपाणी प्रक्रिया केंद्रांपर्यंत आणणे आवश्यक असून त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com