‘कोकणकन्या’ची प्रतीक्षा यादी हजाराच्या पुढे

‘कोकणकन्या’ची प्रतीक्षा यादी हजाराच्या पुढे

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २० : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांची मेल-एक्स्प्रेससाठी तिकीट आरक्षणाची लगबग सुरू झाली आहे; मात्र १५ सप्टेंबर २०२३ रोजी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या ‘कोकणकन्या एक्स्प्रेस’ची प्रतीक्षा यादी अवघ्या काही मिनिटांतच एक हजारांहून अधिक झाल्याने कोकणवासीय चाकरमान्यांचे टेन्शन वाढले आहे. तसेच तुतारी, जनशताब्दी, मांडवी या गाड्यांची प्रतीक्षा यादी भरली असून तिकीट आरक्षित करतेवेळी ‘रिग्रेट’ दाखविले जात असल्याने चाकरमानी मोठ्या पेचात सापडले आहेत.

गणेशोत्सवाला चार महिने उरले असतानाच कोकणात जाणाऱ्या भाविकांनी रेल्वे गाड्यांचे आरक्षण करण्यास सुरुवात केली आहे. दादर, वसई, ठाणे आणि पनवेल आदी स्थानकातून गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या लांबपल्याच्या रेल्वे गाड्या दरवर्षी भरभरून जात असतात. यंदाही १२० दिवस आधीच रेल्वेच्या तिकीट आरक्षणाला सुरुवात झाली. यामध्ये मंगळवार १६ मे रोजी १३ सप्टेंबरच्या एक्स्प्रेसचे आरक्षण; १७ मे रोजी १४ सप्टेंबरचे आरक्षण खुले झाले. कोकण मार्गावर सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या ‘कोकणकन्या’ एक्स्प्रेसचे तिकीट आरक्षणही खुले झाले; परंतु ऑनलाईन प्रक्रियेमुळे या एक्स्प्रेसची एक हजाराहून अधिक तिकिटे अवघ्या काही मिनिटांतच आरक्षित झाली; तर इतर एक्स्प्रेसचे तिकीट काढली असता, ‘रिग्रेट’ दाखवण्यात येत असल्याने प्रवाशांमधून रेल्वेच्या कारभाराविषयी संताप व्यक्त होत आहे.

रद्द केल्यानंतर पूर्ण परतावा
गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी आतापासूनच तिकीट आरक्षित करणे सुरू केले आहे. एकाचवेळी अनेकांनी तिकिटे आरक्षित केल्याने प्रतीक्षा यादी वाढली आहे. इतर एक्स्प्रेसची तिकिटे आरक्षित करतेवेळी ‘रिग्रेट’ दाखवले जात आहे. तसेच ज्या प्रवाशांची नावे प्रतीक्षा यादीत ४०० च्या वर आहेत, त्यांना तिकीट रद्द केल्यानंतर पूर्ण परतावा देण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

१ मिनिट ४७ सेकंदात वेटिंगवर
एका प्रवाशाने माहिती देताना सांगितले, की ‘कोकणकन्या एक्स्प्रेस’ची १५ सप्टेंबर २०२३ चे तिकीट आरक्षण खुले झाल्यानंतर केवळ १ मिनिट ४७ सेकंदात तब्बल १ हजार १७१ वेटिंग मिळाले. खरे तर इतकी तिकिटे आरक्षित होणार नाहीत; तरीही प्रतीक्षा यादीची तिकिटे देण्यात येत आहेत. रेल्वे प्रशासन प्रवाशांकडून पैसे काढून ते १२० दिवस वापरतात. आमची मागणी आहे, की १२० दिवस आधीची आरक्षणाची अट रद्द करून १५ दिवसांची करावी.

तिकिटांचा काळाबाजार
‘आम्ही गेली कित्येक वर्षे मुंबई ते कणकवली अथवा कुडाळ असा प्रवास करतो; परंतु गेल्या काही वर्षांपासून एप्रिल, मे महिना असो गणपती असो अथवा मधल्यावेळी सुद्धा रेल्वेची ‘कन्फर्म’ तिकिटे मिळत नाही. शुक्रवारी (ता. १९) आम्ही सकाळी ८ वाजल्यापासून १६ सप्टेंबरची तिकिटे काढण्याचा प्रयत्न केला; परंतु सर्व एक्स्प्रेसचे आरक्षण करतेवेळी ‘रिग्रेट’ दाखवतात. दलाल आणि काही रेल्वे अधिकारी मिळून तिकिटांचा ‘काळाबाजार’ करीत आहेत,’ असे एका प्रवाशाने खासगीत सांगितले.

संपूर्ण भारतातून सर्वजण एकाच वेळी संकेतस्थळ आणि काऊंटरवर तिकीट आरक्षित करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे काही क्षणात तिकिटे आरक्षित होतात. आता पुढील महिन्यात विशेष गाड्यांची घोषणा करून आरक्षण सुरू करण्याची गरज आहे. यात सर्वप्रथम चिपळूण/रत्नागिरी गाड्या नंतर एक आठवड्याने सावंतवाडी/मडगाव गाड्यांचे आरक्षण सुरू करावे, जेणेकरून गर्दीचे योग्य नियोजन होईल. दरवर्षीच्या चुका टाळून मुंबई-चिपळूण आणि मुंबई-रत्नागिरी दरम्यान स्वतंत्र विशेष गाड्या सोडाव्यात.
- अक्षय महापदी, सदस्य, कोंकण विकास समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com