दीड हजार गुरुजींच्या बदल्या

दीड हजार गुरुजींच्या बदल्या

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २२ : ग्रामीण भागातील कार्यालये, रुग्‍णालये, शाळांमध्ये नियुक्‍ती झाली की बहुतांश सरकारी कर्मचारी नाराज असतात. ही बदला टळावी, यासाठी अनेकजण प्रयत्‍नांची पराकाष्ठही करतात. अनेक वर्ष सोयीच्या ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या जिल्‍ह्यातील शिक्षकांची अखेर उचलबांगडी केली आहे. यंदा संवर्ग १ ते ५ मधील १ हजार ६४३ गुरुजींच्या बदल्या करण्यात आल्‍या आहेत. बदली झालेल्या शिक्षकांच्या कार्यमुक्तीच्या आदेशावर रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांची स्वाक्षरीही झाली आहे. सोमवार, २२ मे ते २४ मे या तीन दिवसांच्या कालावधीत बदली झालेल्या शिक्षकांना जुन्या शाळेतून कार्यमुक्त होऊन नव्या शाळेत रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शिक्षकांना नव्या शैक्षणिक वर्षापासून बदलीच्या ठिकाणी रुजू व्हावे लागणार आहे. या बदल्या टाळण्यासाठी काही शिक्षकांची धावाधाव सुरू होती. राजकीय वजन वापरून बदल्या फिरवण्याचा प्रयत्न सुरू होता. यावरील वादविवाद टाळण्यासाठी जिल्हा परिषदेने समुपदेशाद्वारे शिक्षकांची समजूत काढली. शिक्षकांना त्यांच्या बदलीच्या ठिकाणाची माहिती ऑनलाईन पद्धतीने मिळाली होती. मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार शिक्षकांना प्रत्‍यक्षात बदलीचे आदेश देण्यात आले आहेत.
रायगड जिल्ह्यात शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. जिल्ह्यातील तब्बल १ हजार ६४३ शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या शिक्षकांना कार्यमुक्ती आणि रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अद्याप ३९५ शिक्षकांना निश्‍चित शाळा मिळालेल्‍या नाहीत. या शिक्षकांनी न्यायालयात वयाची अट आणि अन्य कारणांची गरज सादर केली आहे.

अशा झालेल्या बदल्या
विशेष आवश्यकता - २५४ शिक्षक
पती पत्नी एकत्रीकरण - ८१ शिक्षक
सलग तीन वर्ष अवघड क्षेत्र - २३७ शिक्षक
बदलीसाठी पात्र - १०४३ शिक्षक
विस्थापित शिक्षक - ३३ शिक्षक
अवघड क्षेत्रातील जागा - ३९५ शिक्षक


यंदा शिक्षक बदल्यांचे ५ टप्पे विना अडथळा पार पडले तरी सहाव्या टप्प्यात बदली झालेल्या जवळपास ३९५ शिक्षकांपैकी ३२५ शिक्षकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांना बदलीची ऑर्डर देवू नये असे न्यायालयाने सांगितले. त्यांच्या याचिकेवर ७ जून रोजी सुनावणी होणार आहे. मात्र जे न्यायालयात गेले नाही त्यांना बदलीची ऑर्डर देण्यात आली आहे.
- डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी

................

शिक्षक संघटनेची सभा
माणगाव (बातमीदार) ः पुणे येथील शिक्षक भवन या ठिकाणी राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांचे अध्यक्षांची बैठक नुकतीच (ता.१८) संपन्न झाली. सदर बैठकीत मुदत संपल्याने जुनी महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना समन्वय समितीची कार्यकारिणी सर्वानुमते बरखास्त करण्यात आली तर पुढील वर्षासाठी नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली.
जुनी पेन्शन योजना मिळण्यासाठी सरकारने तीन महिन्यांत सकारात्मक निर्णय न दिल्यास राज्यभरात तीव्र आंदोलन करणे, संच मान्यतेसाठी आधारसक्ती रद्द करणे, मुख्यालयी राहण्याची अट रद्द करणे, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी पदे भरणे, बदली धोरणात आवश्यकतेनुसार सुधारणा करणे, शिक्षकांचे वेतन दरमहा एक तारखेला होण्यासाठी आवश्यक प्रयत्न करणे यासंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली. पुढील आठवड्यात राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन तसेच राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, शिक्षण आयुक्त यांची भेट घेऊन निवेदनही देण्यात येणार आहे. या वेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेचे निमंत्रक म्हणून उदय शिंदे, मध्यवर्ती सचिव साजिद अहमद, उर्दू शिक्षक संघटना कोषाध्यक्षपदी राजेश सुर्वे, सल्लागार प्रसाद पाटील, मोहन भोसले, श्रीराम पर्बत, राजाराम वरुटे, भरत रसाळे यांची कार्यकारणीत निवड करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com