३३६ सोसायट्या पालिकेच्या रडारवर

३३६ सोसायट्या पालिकेच्या रडारवर

वाशी, ता. २२ (बातमीदार)ः नवी मुंबई महापालिकेवर यंदा पाणीटंचाईचे संकट आहे. अशातच हवामान खात्याने पावसाचे आगमन यंदा उशिरा होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे पालिकेने पाणी पुरवठ्याचे नियोजन सुरू केले असून मंजूर पाण्याच्या कोट्यापेक्षा अधिक वापर करणाऱ्या ३३६ सोसायट्यांना नोटिसा बजावल्या आहेत.
राज्यातील जलसंपन्न महापालिका असलेल्या नवी मुंबईत खबरदारी म्हणून पाणीपुरवठ्याच्या नियोजनाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. कारण नवी मुंबई महापालिकेच्या मालकीच्या मोरबे धरण क्षेत्रात यंदा कमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे एकीकडे धरण पूर्ण क्षमतेने भरले नसताना दुसरीकडे शहरातील पाण्याचा वापरही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेने प्रत्येक दिवसाच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन केले आहे. याच नियोजनाचा भाग म्हणून सध्या आठवड्यातून एक दिवस एका विभागाचा संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. पण नवी मुंबई शहरात २४ तास पाणीपुरवठ्याची सवय असलेल्या सोसायट्यांमध्ये पाण्याचा गैरवापरही होत आहे. त्यामुळे शहरात ३३६ सोसायट्यांना मंजूर पाणी कोट्यापेक्षा पाण्याचा अधिक वापर होत असल्याने नोटिसा पाठवून पाणी वापरावर नियंत्रण ठेवले नाही तर दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे.
-------------------------------------------------------
३८ टक्के जलसाठा शिल्लक
शहरात २८ एप्रिलपासून विभागवार संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. यामुळे पाण्याची बचत होत आहे. मोरबे धरणात सध्या ३८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पुढील काळाचे नियोजन म्हणून पालिकेने सध्या सुरू असलेली पाणीकपात कायम आहे. अशातच शहरातील सर्वच आठही विभागांतील काही सोसायट्यांमध्ये पाण्याचा अतिरिक्त वापर केला जात असल्याने भविष्यातील पाणीटंचाईचे संकट उद्भवण्याचा धोका आहे.
-------------------------------
शहरातील सोसायट्यांना मंजूर असलेल्या पाण्यापेक्षा अधिक वापर करण्यात आलेल्या शहरातील ३३६ सोसायट्यांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यांनी पाणी वापर कमी न केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा.
- संजय देसाई, शहर अभियंता, नवी मुंबई महापालिका
-----------------------------------------
विभागवार सोसायट्यांची संख्या
बेलापूर - ६०
नेरूळ - १५
वाशी - ७५
तुर्भे - १०
कोपरखैरणे- ५५
घणसोली - ३०
ऐरोली - ८
दिघा - ८०
एकूण - ३३६ सोसायट्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com