मध्य रेल्वे मान्सूनसाठी सज्ज!

मध्य रेल्वे मान्सूनसाठी सज्ज!

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ ः अवघ्या काही दिवसांवर मान्सून येऊन ठेपला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवानी यांनी मान्सून तयारीचा आढावा घेतला. या वेळी रुळावर पाणी साचणाऱ्या २४ धोक्याची ठिकाणे निवडण्यात आली असून या ठिकाणी १६६ पंप दिले जाणार आहेत. त्‍यामुळे यंदा मध्य रेल्‍वेमार्गावरील मुंबईकरांचा प्रवास सुखकारक होणार असल्‍याचे चित्र आहे.
दरवर्षी थोडा पाऊस पडला तरी रेल्वे रूळांवर पाणी साचून लोकलसेवा विस्कळीत होते. मात्र, मध्य रेल्वे प्रशासनाने गेल्या काही वर्षांपासून मान्सून तयारीवर जोर दिला आहे. यंदाही मध्य रेल्वेची मान्सून पूर्व तयारी पूर्ण झाली आहे. रेल्वे महाव्यवस्थापक नरेश लालवानी यांनी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचा मान्सून तयारीचा आढावा घेतला. या वेळी मध्य रेल्वेचे अपर महाव्यवस्थापक आलोक सिंग, मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रजनीश कुमार गोयल यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
या वेळी प्रशासनाने निवडलेल्‍या पाणी साचण्याच्या २४ धोक्याच्या ठिकाणांमध्ये मस्जिद बंदर, माझगाव यार्ड, भायखळा, चिंचपोकळी, करी रोड, परळ, दादर, माटुंगा, शीव, कुर्ला, विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडुप, मुलुंड आणि हार्बर मार्गावरील शिवडी, वडाळा, गुरुतेग बहादूर नगर, चुनाभट्टी, टिळकनगर यांचा समावेश आहे. या ठिकाणी १६६ पंप बसवले जाणार असून त्‍यातील रेल्वे १२० हाय पॉवर पंप, १५ सामान्य पंप आणि मुंबई महापालिका उर्वरित ३१ पंप पुरवणार आहे. यावर्षी पंपांची क्षमता आणि पंपांची संख्या १२.५ एचपी ते १०० एचपी दरम्यान वाढवली आहे.

मायक्रो टनेलिंग -
मस्जिद, सँडहर्स्ट रोड, दादर-परळ परिसर, माटुंगा-शीव परिसर, कुर्ला कारशेड, टिळक नगर नाला, दिवा आणि कळवा अशा ८ ठिकाणी सूक्ष्म बोगदा (मायक्रोटनेलिंग) तयार करण्यात आला आहे. ठाणे-कळवा आणि कळवा-मुंब्रा विभागात दोन नवीन ठिकाणी मायक्रोबोगद्याचे काम सुरू आहे. त्यामुळे रेल्वेच्या बाहेरील पावसाचे पाणी रेल्वे रुळावर येणार नाही, असा दावा केला जात आहे.

नाल्यांतील गाळ काढणे सुरू
मध्य रेल्वेने आपल्या उपनगरीय विभागातील ११८.४८ किलोमीटर नाल्यांचे गाळ काढणे आणि साफसफाई करण्याचे लक्ष्य ठेवले आहे, त्यापैकी १०२.३९ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे आणि सध्या आणखी १६ किलोमीटर नाल्यांच्या साफसफाईचे काम प्रगतीपथावर आहे.

कल्व्हर्टची साफसफाई
मध्य रेल्वेने आपल्या उपनगरीय विभागांतील ८८ कल्व्हर्ट्स स्वच्छ केले आहेत आणि सध्या आणखी १७ कल्व्हर्ट्सच्या साफसफाईचे काम प्रगतीपथावर आहे. कुर्ला-ट्रॉम्बे परिसर, चुनाभट्टी, वडाळा रोड, विद्याविहार- लोकमान्य टिळक टर्मिनस परिसर आणि टिळक नगर येथे आरसीसी बॉक्स टाकून कल्व्हर्ट वाढीचे काम होते.

झाडांची छाटणी
४३ झाडे छाटण्याचे काम करण्यात आले असून २३ झाडांचे काम प्रगतीपथावर आहे.

ट्रॅक उचलणे
४७.८ किमी ट्रॅक लिफ्टिंगचे नियोजन करण्यात आलेले आहे ते पुढील महिन्यापर्यंत पूर्ण होईल.


ही कामे प्रगतीपथावर
प्री-मॉन्सून वॉटर प्रूफ केबल मेगरिंग जवळजवळ ८३ टक्‍के काम पूर्ण, उर्वरित काम १ आठवड्यात पूर्ण होईल.
घाट विभागातील ३१ स्टॅटिक वॉचमन हट येथे सीसीटीव्ही आणि टेलिफोनची तरतूद.
२७७ ठिकाणी वॉटरप्रूफ पॉइंट मोटार मशिन प्रदान केल्या आहेत.
मस्जिद, भायखळा, माटुंगा आणि शीव -कुर्ला भागात फ्लड गेट्स बसवणे.
लोकमान्य टिळक टर्मिनस येथील बंटर भवन नाला अतिक्रमण हटवून जोडला जाणार आहे.
कर्वे नगर नाला सुधारणेचे काम पालिकेद्वारे केले जाणार आहे
प्रियदर्शनी, चुनाभट्टी येथे जलवाहिन्यांच्या खाली साठलेले काँक्रीट साफ करण्याच्या कामासाठी सल्लागाराची नियुक्ती

चोवीस तास नियंत्रण कक्ष
मध्य रेल्वे नियंत्रण कार्यालय चोवीस तास कार्यरत राहणार आहे. सतत देखरेख आणि सतत अपडेटसाठी हवामान विभाग, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि पूरप्रवण भागात नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांशी येथून संपर्क ठेवला जाईल. पावसाळ्याच्या कालावधीत नियंत्रण कार्यालयाकडून क्षेत्रीय कर्मचार्‍यांकडून पाऊस आणि ट्रॅकच्या वरच्या पाण्याच्या पातळीचे प्रत्येक तासाला निरीक्षण केले जाते.

आतापर्यंत चार बैठका
राज्य सरकार, मुंबई महापालिका, ठाणे महापालिका, नवी मुंबई महापालिका सोबत जवळचा समन्वय ठेवला जात आहे. रेल्वे आणि राज्य अधिकारी यांच्यात नियमित बैठका होत असून महापालिका आयुक्त, अपर महापालिका आयुक्त, मुख्य अभियंता यांच्यासोबत आतापर्यंत चार बैठका झाल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com